उजनी धरण परिसरात कुगाव–इंदापूर जोडपूलाचे काम सुरू; विकासाला नवा सेतू

0
उजनी धरण परिसरात कुगाव–इंदापूर जोडपूलाचे काम सुरू; विकासाला नवा सेतू

उजनी धरण परिसरात कुगाव–इंदापूर जोडपूलाचे काम सुरू; विकासाला नवा सेतू

सोलापूरच्या कुगाव–इंदापूर जोडपुलाच्या कामाला सुरुवात झाली असून, ३९६ कोटींचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शिक्षण, आरोग्य, शेती व दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.

सायली मेमाणे

पुणे २९ ऑगस्ट २०२५ :सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव हे उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये वसलेले एक नैसर्गिक सौंदर्याने नटलेले गाव आहे. तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या या गावाला इंदापूर शहर फक्त नऊ किलोमीटर अंतरावर असले, तरी तेथील नागरिकांना शिक्षण, आरोग्यसेवा, बाजारपेठ किंवा शेतीच्या व्यवहारांसाठी तब्बल शंभर किलोमीटरचा फेरा मारावा लागत होता. हा त्रास दूर व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून कुगाव ते इंदापूर जोडपुलाची मागणी सातत्याने होत होती.

या मागणीसाठी तत्कालीन सरपंच तेजस्विनी दयानंद कोकरे यांनी शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला. यानंतर इंदापूरचे आमदार आणि तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी या मागणीला पाठिंबा देत या प्रकल्पाला गती दिली. त्यानंतर निर्णायक पाऊल उचलत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत पुलासाठी अधिकृत मंजुरी मिळवून दिली. फक्त मंजुरीच नव्हे, तर सुमारे ३९६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता तात्काळ मिळवून या प्रकल्पाला प्रत्यक्ष स्वरूप देण्यात आले.

शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २३ ऑगस्ट २०२४ रोजी या पुलाच्या कामाला शुभारंभ झाला. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून, येत्या काही वर्षांत हा पूल पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे करमाळा व इंदापूर तालुक्यांमधील दळणवळण अधिक सोयीचे व सुरक्षित होणार आहे.

पुलामुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होईल, शेतकऱ्यांना बाजारपेठांपर्यंत पोहोचणे सोपे होईल आणि त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. आरोग्यसेवा व शिक्षणासाठी नागरिकांना आता लांबचा प्रवास करावा लागणार नाही. याशिवाय रोजगार, व्यापार आणि सामाजिक आदानप्रदानासाठीही या पुलाचे महत्त्व प्रचंड आहे.

वर्षानुवर्षे वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जाणाऱ्या कुगाव व परिसरातील नागरिकांसाठी हा पूल जीवनवाहिनी ठरणार आहे. उजनी धरण परिसरात विकासाचा नवा सेतू उभारला जात असल्याने नागरिकांमध्ये आनंद व आशावादाचे वातावरण आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *