कराडच्या शनिवार पेठेतील दुकानाला भीषण आग; २० लाखांचे नुकसान
कराड शहरातील शनिवार पेठेतील खाजा खिजर दर्गा परिसरात सोमवारी मध्यरात्री साडेएकच्या सुमारास भीषण आग
कराडच्या खाजा खिजर दर्ग्याजवळील पान शॉप साहित्याच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागून २० लाखांचे साहित्य खाक, शॉर्टसर्किटचा संशय.
सायली मेमाणे
२६ जून २०२५ : कराड शहरातील शनिवार पेठेतील खाजा खिजर दर्गा परिसरात सोमवारी मध्यरात्री साडेएकच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. जमीर आमिन खान यांच्या ‘यादगार ट्रेडर्स’ या पान शॉप साहित्याच्या होलसेल दुकानात अचानक आग लागली असून, या आगीत दुकानातील सिगारेट, तंबाखू, चहा पावडर, बिस्किट, गोळ्या, शॅम्पू, कोलगेट, चिप्स इत्यादी महत्त्वाचे किरकोळ साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. या आगीत अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच जमीर खान तात्काळ दुकानाकडे गेले असता धुराचे लोट आणि ज्वाळा त्यांच्या निदर्शनास आल्या. याबाबत त्यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी पोहचले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले, तरी प्राथमिक अंदाज शॉर्ट सर्किटचा व्यक्त केला जात आहे. दुकान संपूर्णतः बंद असल्याने मानवी जीवितहानी टळली. मात्र, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकातही काही दिवसांपूर्वी अशाच स्वरूपाची भीषण आग लागल्याची घटना घडली. स्टेशनवरील एका केक विक्री करणाऱ्या दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली होती. घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या तुकड्यांनी आग नियंत्रणात आणली असली तरी प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
कराड व मुंबईतील या दोन घटनांनी सार्वजनिक ठिकाणी व व्यापारी परिसरात वीज व्यवस्थापनाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्यापारी प्रतिष्ठानांनी विद्युत उपकरणांची नियमित तपासणी करणे, फायर सेफ्टी उपकरणे वापरणे आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवणे गरजेचे असल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.