“कात्रज मंडई चौकात ड्युटीवर असताना वाहतूक पोलिसाचा मृत्यू; पुणे शहरात शोकाची लाट”

0
“कात्रज मंडई चौकात ड्युटीवर असताना वाहतूक पोलिसाचा मृत्यू

“कात्रज मंडई चौकात ड्युटीवर असताना वाहतूक पोलिसाचा मृत्यू

“पुणे शहर वाहतूक पोलिस विभागातील 42 वर्षीय पोलिस नाईक धनाजी वणवे यांना ड्युटीवर असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. त्यांच्या सेवेसंदर्भातील माहिती आणि पुणे पोलिस दलाकडून वाहिलेली श्रद्धांजली वाचा.”

सायली मेमाणे

पुणे १० जुलै २०२५ : पुणे: शहरातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी नेटाने पार पाडणारे पोलीस नाईक धनाजी भरत वणवे (वय 42) यांचे बुधवारी सायंकाळी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पुण्याच्या कात्रज मंडई चौकात ड्युटीवर असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनाने पुणे वाहतूक विभागात शोककळा पसरली असून, सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुधवारी सायंकाळी साधारणपणे पावणे सातच्या सुमारास ड्युटीवर असताना धनाजी वणवे यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. आजूबाजूच्या सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना साईस्नेह हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर उपचार सुरू होण्याआधीच त्यांना मृत घोषित केलं. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

धनाजी वणवे हे गेली अनेक वर्षे पुणे शहर वाहतूक शाखेत पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. ते शिस्तप्रिय, जबाबदारीने काम करणारे आणि सर्वांशी मनमिळावू वर्तन करणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण विभाग शोकाकुल झाला आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अनेक सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी वणवे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पुणे वाहतूक विभागाने त्यांच्या सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं आहे.

धनाजी वणवे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस दलाकडून त्यांच्या कुटुंबासाठी विशेष मदतीचा प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

या घटनेनंतर पोलिसांच्या तणावपूर्ण ड्युटी, वेळोवेळी होणाऱ्या ड्युटी बदल्या आणि कमी विश्रांती या बाबींवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. वाहनांची वाढती संख्या, वाढलेला ट्रॅफिक आणि पोलिसांची मर्यादित संख्या लक्षात घेता अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी वैद्यकीय तपासण्या, विश्रांतीसाठी वेळेचे नियोजन आणि ताणतणाव व्यवस्थापन अत्यावश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

धनाजी वणवे यांना पुणे पोलीस दलाच्या वतीने शासकीय इतमामात अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सहकाऱ्यांनी त्यांचा सेवाभाव, शिस्त आणि समर्पण कायम स्मरणात राहील असं सांगत त्यांना अंतिम निरोप दिला.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed