टपाल विभागाचा सर्व्हर डाऊन! वडगाव मावळमध्ये राखी पाठवणाऱ्या बहिणींचा हिरमोड

0
टपाल विभागाचा सर्व्हर डाऊन! वडगाव मावळमध्ये राखी पाठवणाऱ्या बहिणींचा हिरमोड

टपाल विभागाचा सर्व्हर डाऊन! वडगाव मावळमध्ये राखी पाठवणाऱ्या बहिणींचा हिरमोड

राखी पौर्णिमेआधी वडगाव मावळ टपाल विभागाचा सर्व्हर डाऊन, बहिणी तासनतास रांगेत उभ्या; राखी पाठवण्याची तयारी ठप्प.

सायली मेमाणे

पुणे ८ ऑगस्ट २०२५ :राखीपौर्णिमा काही दिवसांवर आली असताना वडगाव मावळ टपाल विभागाच्या सर्व्हर डाऊन समस्येमुळे नागरिक, विशेषतः राखी पाठवण्यासाठी आलेल्या बहिणी, मोठ्या गैरसोयीचा सामना करत आहेत. अनेक वर्षांपासून टपालाने राखी पाठवण्याची परंपरा जपणाऱ्या महिलांसाठी हा तांत्रिक अडथळा निराशाजनक ठरत आहे.

९ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा साजरी होणार असून, भावापासून दूर राहणाऱ्या बहिणी राख्या टपालाने पाठवण्याची तयारी करत होत्या. मात्र, वडगाव मावळासह मावळ तालुक्यातील बहुतांश टपाल केंद्रांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे सकाळपासूनच कामकाज ठप्प झाले. यामुळे राखी पाठवण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले, तर काहींना वेळेअभावी माघारी जावे लागले.

गुरुवार सकाळपासून तळेगाव, वडगाव शहर आणि परिसरातील टपाल केंद्रांमध्ये ही समस्या जाणवली. एका टपाल केंद्राचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेकांनी दुसऱ्या केंद्राकडे धाव घेतली, परंतु तिथेही तोच अनुभव आला. परिणामी, नागरिकांची मोठी धावपळ आणि वेळेचा अपव्यय झाला.

कामावर जाणारे, तसेच मर्यादित वेळ काढून राखी पाठवण्यासाठी आलेले लोक यामुळे त्रस्त झाले. “सकाळी ९ वाजता रांगेत उभा राहिलो, पण तासभर उलटूनही नंबर आला नाही. आणि नंबर आल्यानंतर सर्व्हर डाऊन असल्याचं सांगण्यात आलं,” अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.

ही समस्या केवळ राखी पाठवण्यापुरतीच मर्यादित राहिली नाही. इतर टपाली कामे जसे की पत्रव्यवहार, पार्सल सेवा, आणि बँकिंग सेवा यांनाही फटका बसला. ग्रामीण आणि शहरी भागात टपाल सेवा अजूनही अनेकांसाठी महत्त्वाची असल्याने, अशा तांत्रिक अडथळ्यांनी नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी टपाल विभागाकडे तातडीने सर्व्हर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. राखीपौर्णिमेसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर अशा समस्यांमुळे भाव-बहिणींच्या भावना दुखावल्या जात असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

जर टपाल विभागाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर पुढील काही दिवसांत ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. कारण सणासुदीच्या काळात टपाल सेवेवरील अवलंबित्व वाढते आणि या काळात कामकाज ठप्प राहिल्यास हजारो लोक प्रभावित होऊ शकतात.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed