ठाण्यात माजी मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार; पुनर्विकासाच्या तक्रारींवर ठोस कार्यवाहीचे आश्वासन
ठाण्यात माजी मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार; पुनर्विकासाच्या तक्रारींवर ठोस कार्यवाहीचे आश्वासन
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे माजी मंत्री गणेश नाईक यांच्या तिसऱ्या जनता दरबारात नागरिकांनी पुनर्विकासासह विविध तक्रारी मांडल्या. नाईक यांनी समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
सायली मेमाणे
पुणे २२ ऑगस्ट २०२५ : ठाणे – ठाण्यात पुनर्विकास, घरांचे तोडफोडीचे प्रश्न, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी आणि प्रशासकीय अडचणींनी नागरिक हैराण झालेले आहेत. या सर्व तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी माजी मंत्री गणेश नाईक यांनी ‘जनता दरबार’ मालिकेची सुरुवात केली आहे. या मालिकेतील तिसरा जनता दरबार रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला.
याआधी पहिला जनता दरबार खारकर आळी येथे तर दुसरा डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला होता. नागरिकांनी आपल्या तक्रारी थेट नाईक यांच्यासमोर मांडल्या. विशेषतः पुनर्विकासाच्या नावाखाली घरं पाडणे, नागरिकांना योग्य पर्याय न देणे आणि बिल्डर व प्रशासनाची दिरंगाई या मुद्द्यांवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
दरबारात बोलताना गणेश नाईक म्हणाले, “सामान्य माणसांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्यावर ठोस कार्यवाही करणे ही माझी जबाबदारी आहे. पुनर्विकासासह सर्व तक्रारींवर ठोस पावले उचलली जातील.”
या दरबारात पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, आरोग्य सेवा आणि स्थानिक पायाभूत सुविधा याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. नाईक यांनी सर्व नागरिकांना खात्री दिली की, त्यांच्या अडचणी नुसत्याच ऐकून घेतल्या जाणार नाहीत, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करून न्याय दिला जाईल.
ठाणेतील नागरिकांच्या दैनंदिन समस्या, विशेषतः पुनर्विकासाशी संबंधित तक्रारींना तोडगा मिळण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.