पनवेल चिखले गावातील गायरान जमिनीच्या वादातून तणाव, १६ ग्रामस्थांविरोधात गुन्हा
पनवेल चिखले गावातील गायरान जमिनीच्या वादातून तणाव, १६ ग्रामस्थांविरोधात गुन्हा
पनवेल तालुक्यातील चिखले गावात गायरान जमिनीच्या वादातून गटविकास अधिकाऱ्यांचे वाहन अडवले. १६ ग्रामस्थांविरोधात गुन्हा, सरपंच तांडेल दाम्पत्याने आत्महत्येचा दिला इशारा.
सायली मेमाणे
पुणे 31 जुलै २०२५ : पनवेल तालुक्यातील चिखले गावात गायरान जमिनीच्या वादातून निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात गटविकास अधिकाऱ्यांचे वाहन अडवण्यात आले असून, या प्रकरणी पनवेल पोलिसांनी १६ ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २९ जुलै रोजी दुपारी सव्वा तीन वाजता घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावच्या सरपंच दीपाली तांडेल व त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी आत्महत्येचा इशारा देत फिनाइलचे प्राशन केल्याने खळबळ उडाली. त्यांना पोलिसांनी वेळेवर रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर गटविकास अधिकारी समीर वठारकर व ग्रामसेवक गणेश पाटील हे रुग्णालयातून परतत असताना, जिल्हा परिषद शाळेसमोर ग्रामस्थांनी त्यांच्या वाहनाला अडवले. वाहनासमोर बसून त्यांनी तांडेल दाम्पत्याच्या मागण्या मान्य करण्याची मागणी करत एक तास आंदोलन केले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व पथक घटनास्थळी दाखल झाले आणि समजूत घालून अधिकारी सुरक्षितरित्या बाहेर पडले.
या घटनेनंतर पोलिसांनी १६ ग्रामस्थांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, तपासादरम्यान आणखी एक खुलासा झाला आहे की सरपंच दीपाली तांडेल व ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी न घेता गायरान जमिनीवर प्लॉटिंग सुरू केली होती. या प्रकरणीही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे सरपंचपद धोक्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पनवेलचे प्रांताधिकारी पवन चांडक यांनी आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीत पोलिस, महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्यात पुढील कारवाई आणि सुरक्षा यंत्रणेबाबत चर्चा करण्यात आली. गावात सध्या तणावाचे वातावरण असून पोलिसांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे चिखले गाव पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.