पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग आपत्तीला सज्ज; नागरिकांसाठी रेस्क्यू टीम तैनात
पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग आपत्तीला सज्ज
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पूरस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशमन विभाग सज्ज केला असून, नागरिकांसाठी आपत्कालीन मदतीसाठी विशेष पथकांची तैनाती केली आहे.
सायली मेमाणे
पुणे २९ जुलै २०२५ : पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे संभाव्य पूरस्थिती किंवा इतर नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी महापालिकेचा अग्निशमन विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात विशेष पूर नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, या पथकांकडे आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत, बचावकार्य आणि नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या पथकांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी असून, त्यांना पोहण्याचे आणि बचाव कार्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. पूरप्रवण भाग, पाण्याची पातळी, वाहणाऱ्या पाण्याचा वेग आणि साचणाऱ्या ठिकाणांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे बचाव कार्य वेगाने आणि अचूकपणे पार पाडले जाणार आहे.
महापालिकेने बचाव कार्यासाठी आधुनिक व अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये १० रबर बोट्स (IRB), २०० लाइफ जॅकेट्स, ४४ लाइफ रिंग्स, ५९ रोप्स, १० हुक्स, १३ पोर्टेबल पंप, वॉटर टेंडर, क्विक रिस्पॉन्स व्हेईकल्स, फायर फायटिंग मोटारसायकल्स, ४८ कार्यरत अग्निशमन वाहने, वायरलेस सेट्स, वॉकी-टॉकी, मेगाफोन आणि टॉर्चेस यांचा समावेश आहे. या सगळ्या सुविधा २४ तास कार्यरत असून, आपत्कालीन कॉल मिळताच त्वरित प्रतिसाद देण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पूरस्थिती किंवा इतर आपत्ती उद्भवल्यास घाबरून न जाता १०० (पोलीस), १०१ (अग्निशमन) किंवा १०८ (आपत्कालीन मदत) या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा. त्याचप्रमाणे संबंधित प्रभाग कार्यालय अथवा अग्निशमन केंद्राशी थेट संवाद साधावा, जेणेकरून मदत त्वरित पोहोचू शकेल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता महापालिकेच्या अधिकृत मार्गदर्शनानुसार वागावे, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
पूरनियंत्रणासाठी तैनात पथकांनी पूर्वतयारी म्हणून विविध ठिकाणी ड्रिल्स देखील पार पाडल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी कार्य अधिक प्रभावी ठरेल. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि जलद मदत पोहोचवण्यासाठी महापालिकेने वेळेपूर्वीच काटेकोर तयारी करून ठेवली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात रहिवासी नागरिक अधिक सुरक्षित असल्याची खात्री प्रशासनाने दिली आहे.