पुणे भवानी पेठमध्ये चार महिन्यांतच रस्ते पुन्हा कोसळले; मनसेचा रांगोळी आणि फुलांची माळ घालून निषेध
भवानी पेठमधील खराब रस्त्यांवर मनसेने रांगोळी व फुलांची माळ घालून निषेध व्यक्त केला,
पुण्यातील भवानी पेठमधील रस्ते चार महिन्यांतच पुन्हा खराब; PMC विरोधात मनसेचा रांगोळी व फुलांची माळ घालून निषेध. नागरिकांनी कायमस्वरूपी डागडुजीची मागणी केली आहे.
सायली मेमाणे
पुणे ३ जुलै २०२५ : पुणे : शहरातील भवानी पेठमधील रहिवाशांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा PMC विरुद्ध आवाज उठवला आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी डागडुजी केलेल्या रस्त्यांवर आता पुन्हा मोठे खड्डे पडले असून, त्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक १८ मधील चर्च ते शितळादेवी चौक खडकमाळ आळी या अरुंद रस्त्यावर सध्या १५ ते २० फूट लांब मोठा खड्डा निर्माण झाला आहे.
PMC कडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी वेगळ्या पद्धतीने निषेध केला. या खड्ड्याभोवती रांगोळी काढली आणि त्यावर फुलांची माळ घालून “PMCच्या निकृष्ट कामकाजाचा गौरव” केला गेला.
माहिती देताना मनसेचे स्थानिक पदाधिकारी रवि साहणे आणि संग्राम तळेकर यांनी PMCच्या रस्ते दुरुस्तीवरील अपयशावर टीका केली. “चारच महिन्यांपूर्वी भवानी पेठ विभागीय कार्यालयात आंदोलन करून रस्त्यांचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्याची मागणी केली होती. PMCने आश्वासन दिलं होतं, पण आज पुन्हा तेच रस्ते खचले आहेत,” अशी टीका तळेकर यांनी केली.
साहणे यांनी इशारा दिला की, “जर वेळेत रस्त्यांचे योग्य दुरुस्तीचे काम झाले नाही, तर आम्ही या खड्ड्यांमध्ये साचलेलं पाणी थेट PMC कार्यालयात घेऊन जाऊ.”
दरम्यान, स्थानिक नागरिक देखील संतप्त आहेत. मुसळधार पावसात खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः खडकमाळ आळीमधील ही परिस्थिती लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरू शकते. नुकतीच केलेली डागडुजी इतक्या लवकर निकामी झाल्याने PMCच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी यावेळी स्पष्ट मागणी केली आहे की, प्रत्येक पावसाळ्यात पुन्हा पुन्हा होत असलेल्या डागडुजीच्या कामावर आता विश्वास नाही. त्यांनी कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्तीची मागणी केली असून दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.