पुणे: 23 वर्षीय IT इंजिनिअरची आत्महत्या; शनी शिंगणापूरच्या अधिकाऱ्याचाही मृत्यू
पुणे: 23 वर्षीय IT इंजिनिअरची आत्महत्या; शनी शिंगणापूरच्या अधिकाऱ्याचाही मृत्यू
पुणे 23 वर्षीय IT इंजिनिअरने आत्महत्या केली, तर शनी शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनीही गळफास घेऊन जीवन संपवलं. पोलिस तपास सुरू.
सायली मेमाणे
पुणे २९ जुलै २०२५ : पुण्यात एक दु:खद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय IT इंजिनिअर पीयूष अशोक कवडे याने हिंजवडीतील ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. पीयूष गेल्या वर्षभरापासून या कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. या घटनेने संपूर्ण आयटी क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
ही घटना सोमवारी, 28 जुलै रोजी दुपारी घडली. पीयूषने आत्महत्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती ज्यामध्ये त्याने स्पष्ट केलं की त्याच्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये. पोलिसांनी सांगितलं की, या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही, मात्र हे वैयक्तिक कारणांमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, आणखी एक धक्कादायक घटना शनी शिंगणापूर येथे घडली. देवस्थानचे माजी विश्वस्त आणि विद्यमान उप कार्यकारी अधिकारी नितीन सूर्यभान शेटे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ते 43 वर्षांचे होते आणि त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
शनी शिंगणापूर देवस्थानसंदर्भातील वाद सध्या धर्मादाय आयुक्तांच्या न्यायप्रविष्टीत आहेत. मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणे, बोगस आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती, बनावट मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे भाविकांची फसवणूक या प्रकरणांनी देवस्थान चर्चेत आलं आहे. या वादांचा परिणाम नितीन शेटे यांच्या मानसिकतेवर झाला होता का, याचा पोलिस तपास करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही.
या दोन आत्महत्या म्हणजे समाजात वाढणारा मानसिक तणाव आणि कामाच्या ओझ्याचे गंभीर परिणाम असल्याचे संकेत आहेत. विशेषतः तरुण पिढीतील मानसिक आरोग्याचा प्रश्न अधिक ठळकपणे समोर येत आहे. पोलीस विभाग दोन्ही प्रकरणांतील सर्व शक्य कोन तपासत असून यामध्ये कोणताही गुन्हेगारी संकेत सापडतो का याचा तपास करत आहेत.