पुण्यात शिक्षकाचा दुचाकी अपघातात मृत्यू; रस्त्यावरील खड्ड्यांचा बळी

0
पुण्यात शिक्षकाचा दुचाकी अपघातात मृत्यू

पुण्यात शिक्षकाचा दुचाकी अपघातात मृत्यू

पुण्यात नऱ्हे परिसरातील खड्ड्यांमुळे शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू, सरकार व ठेकेदारांच्या निष्काळजीपणावर संताप; गुन्हा दाखल करण्याची मागणी.

सायली मेमाणे

पुणे १० जुलै २०२५ : पुणे : राज्यात जोरदार पावसाळा सुरू असतानाच पुण्यात पुन्हा एकदा सरकारी अनास्थेने बळी घेतला आहे. नऱ्हे परिसरातील धोकादायक खड्ड्यामुळे चव्हाण महाविद्यालयातील शिक्षक सचिन हंगे (वय ३९, रा. धायरी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे या कर्तव्यदक्ष शिक्षकाचा जीव गेला, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे.

तीन दिवसांपूर्वी हंगे हे आपल्या दुचाकीने धायरी फाटा ते नऱ्हे दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्यावरून जात असताना रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे एका मोठ्या खड्ड्याचे दर्शन झाले नाही. दुचाकीवरील तोल जाऊन ते जोरात रस्त्यावर आदळले. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. प्रथम त्यांना धायरीतील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि नंतर पुढील उपचारांसाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेनंतर स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते संतप्त झाले असून, खड्ड्यांच्या समस्येबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे, नऱ्हे परिसरातील रस्ते पुणे महापालिकेच्या अखत्यारित गेल्यानंतरही त्यांच्या देखरेखीची अवस्था अत्यंत दयनीय आहे.

सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी संबंधित ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, जर वेळेवर रस्ता दुरुस्त करण्यात आला असता, तर हंगे यांचा जीव वाचू शकला असता.

हंगे हे आपल्या क्षेत्रात अत्यंत आदरणीय आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक होते. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबावरच नव्हे, तर विद्यार्थ्यांवरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले व वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.

स्थानिक नागरिकांनी PMC च्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणतात, “जर या अपघाताला जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल झाला नाही, आणि कुटुंबाला नुकसान भरपाई मिळाली नाही, तर आम्ही आंदोलन करू.”

हा प्रकार सरकारच्या रस्तानिर्माण धोरणांतील दुबळेपणा, ठेकेदारांच्या भ्रष्ट कामांची पावती आणि PMC च्या कामकाजातील ढिसाळपणा अधोरेखित करतो. दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात, अनेकांचे प्राण जातात, पण तरीही कोणताही धोरणात्मक बदल होत नाही हे दुर्दैव आहे.

हंगे यांचा मृत्यू म्हणजे केवळ एक अपघात नसून, प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा बळी आहे. या घटनेनंतर तरी PMC ने जागे होऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed