फरासखाना वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने पीएमटी ड्रायव्हरचे प्राण वाचले
फरासखाना वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने पीएमटी ड्रायव्हरचे प्राण वाचले
पुण्यातील फरासखाना वाहतूक विभागातील पोलिस अंमलदार रोमेश ढावरे आणि महिला पोलीस अर्चना निमगिरे यांनी हृदयविकाराच्या झटक्याने कोसळलेल्या पीएमटी बस ड्रायव्हरचे प्राण वाचवले. जाणून घ्या संपूर्ण घटना.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे २६ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी फरासखाना वाहतूक विभागातील पोलिस सकाळपासून कामात गुंतलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज रोड आणि लक्ष्मी रोड परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. अशा परिस्थितीत बेलबाग चौकात संध्याकाळी ७.१५ वाजता एक धक्कादायक घटना घडली. पुणे स्टेशन ते कुंबरे पार्क (कोथरुड डेपो) या मार्गावरील पीएमटी बस (क्रमांक MH-12-QG-2067) सीटी पोस्ट ऑफिससमोर आली असता चालक अनिल लक्ष्मण अंबुरे (वय ४१, रा. वारजे माळवाडी) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. बस चालवताना अचानक ते कोसळल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा केला आणि आवाज बेलबाग चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांपर्यंत पोहोचला.
त्या वेळी ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल ८९६८ रोमेश ढावरे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल ८०९२ अर्चना निमगिरे यांनी तत्परता दाखवत लगेच बसकडे धाव घेतली. बसमध्ये प्रवेश करून त्यांनी परिस्थिती पाहिली आणि चालक बेशुद्धावस्थेत असल्याचे लक्षात आले. प्रवाशांच्या मदतीने चालकाला बसमधून बाहेर काढून फुटपाथवर झोपवण्यात आले. या वेळी पोलीस कॉन्स्टेबल रोमेश ढावरे यांनी वेळ न दवडता चालकाला हाताने सीपीआर देण्यास सुरुवात केली. काही मिनिटांतच बसचालक शुद्धीवर आला, मात्र पुढील उपचारांची आवश्यकता असल्याने वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे महत्त्वाचे होते.
याबाबत ढावरे यांनी तातडीने फरासखाना वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे आणि सहप्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांना कल्पना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बस चालकाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. अॅम्बुलन्सची वाट न पाहता तातडीने रिक्षा चालक राजेश शंकर आरकल (रा. मार्केटयार्ड, पुणे) यांच्या मदतीने चालकाला रिक्षामध्ये बसवून पुणे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
या संपूर्ण घटनेत वाहतूक पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि रिक्षा चालकाने दिलेली मदत कौतुकास्पद ठरली. रोमेश ढावरे आणि अर्चना निमगिरे यांनी गर्दीत वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आपले कर्तव्य बजावत असतानाच मानवी जीवन वाचविण्याची मोठी जबाबदारी पार पाडली. वेळेवर दिलेल्या प्राथमिक उपचारांमुळे आणि त्वरित रुग्णालयात दाखल केल्यामुळे पीएमटी बस चालकाचे प्राण वाचले.
ही घटना केवळ पोलिसांच्या दक्षतेचीच नाही तर सामान्य नागरिकांच्या सहकार्याने जीव वाचवता येतो, याचेही उदाहरण ठरली आहे. गर्दीच्या रस्त्यांवर ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस केवळ ट्रॅफिक नियंत्रणापुरते मर्यादित नसून आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठीही पुढाकार घेतात, हे या घटनेतून स्पष्ट झाले. फरासखाना वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तात्परता गणेशोत्सवासारख्या गर्दीच्या काळात पुणेकरांसाठी नक्कीच दिलासादायक आहे.