मुंबई : जे.जे. रुग्णालयाच्या ३२ वर्षीय डॉक्टरने अटल सेतूवरून उडी घेतल्याने खळबळ; युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू
जे.जे. रुग्णालयाच्या ३२ वर्षीय डॉक्टरने अटल सेतूवरून उडी घेतल्याने खळबळ
अटल सेतूवरून ३२ वर्षीय डॉक्टरची आत्महत्येचा प्रयत्न; होंडा अमेझ कार, आयफोन सापडला, बचावमोहीम सुरू, मात्र ठावठिकाणा अद्याप अज्ञात.
सायली मेमाणे
नवी मुंबई ८ जुलै २०२५ : नवी मुंबई – जे.जे. रुग्णालयातील ३२ वर्षीय डॉक्टरने अटल सेतूवरून खाडीत उडी घेतल्याने नवी मुंबई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. ओंकार भागवत कवितके असे या डॉक्टरचे नाव असून, ते कळंबोली येथे राहत होते. ही घटना सोमवारी ८ जुलै रोजी रात्री ९:४३ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती अटल सेतू नियंत्रण कक्षाला मिळताच पोलिसांनी आणि सागरी सुरक्षादलांनी घटनास्थळी धाव घेतली असून, युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. मात्र उफाळलेल्या लाटा आणि अंधारामुळे अद्याप डॉक्टर कवितके यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९:४३ वाजता अटल सेतूच्या ११.८ किमी बिंदूवरून एका इसमाने उडी घेतल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. बीट मार्शल आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी तपास करताना पोलिसांना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एक होंडा अमेझ कार (MH 46 CM 6837) उभी असल्याचे आढळून आले. या कारमधून मिळालेल्या आयफोनमुळे उडी घेणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले.
पोलिसांनी फोनमधील संपर्क क्रमांकांच्या आधारे डॉक्टर ओंकार कवितके यांच्या बहिणी कोमल प्रमोद लंबाते यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्या नातेवाइकांसह कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. या घटनेनंतर सागरी सुरक्षा विभागाची ‘ध्रुवतारा’ नावाची बोट, रेस्क्यू टीम आणि ॲम्बुलन्सच्या सहाय्याने खाडीलगत आणि जलक्षेत्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
तथापि, या शोध मोहिमेस अद्याप यश मिळालेले नाही. समुद्रात उफाळलेल्या लाटा आणि रात्रीचा अंधार यामुळे शोधकार्याला अडथळा निर्माण झाला आहे. पोलिसांनी खाडी परिसरातील स्थानिक नागरिकांना आवाहन केले आहे की, जर त्यांना या घटनेशी संबंधित काही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आहे की, “ही अतिशय संवेदनशील घटना असून, आम्ही युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहोत. लवकरच या प्रकरणाचा खुलासा होईल.”
अटल सेतूसारख्या उच्च दर्जाच्या आणि वाहतूकदृष्ट्या महत्त्वाच्या पुलावर ही पहिली आत्महत्येची घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, त्यामुळे या पुलाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत स्थानिक नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. काही नागरिकांनी सेतूवर सीसीटीव्ही, जादा पोलीस बंदोबस्त आणि बचाव यंत्रणा कायमस्वरूपी तैनात करण्याची मागणी केली आहे.
डॉ. ओंकार कवितके यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून, वैयक्तिक, मानसिक व सामाजिक कारणांचा विचार करत तपासाची दिशा ठरवण्यात येत आहे.
अंतिम निष्कर्ष मिळेपर्यंत ही घटना वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण डॉक्टरांवरील मानसिक तणावाचा गूढ संदेश देत आहे. प्रशासन आणि समाजाने या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.