यवतमाळमध्ये पाच दशकांपासून रस्ताच नाही; रुग्णाला खाटेवरून उचलून नेण्याची वेळ
यवतमाळमध्ये पाच दशकांपासून रस्ताच नाही; रुग्णाला खाटेवरून उचलून नेण्याची वेळ
यवतमाळच्या जनुना वरुडबिबी या गावात अजूनही पक्का रस्ता नाही. पावसात चिखलामुळे रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही; अलीकडे एका वृद्ध रुग्णाला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली.
सायली मेमाणे
यवतमाळ ११ जुलै २०२५ : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील जनुना वरुडबिबी या गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था समोर आली असून, अजूनही त्या गावात पक्का रस्ता पोहोचलेला नाही. पावसाळ्यात रस्ते पूर्णतः चिखलमय होतात, आणि त्यामुळे कोणतेही वाहन, अगदी रुग्णवाहिकाही पोहोचू शकत नाही. परिणामी, अलीकडे एका वृद्ध रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी चक्क खाटेवरून दोन किलोमीटर चिखलातून उचलून रुग्णालयात न्यावे लागले.
या गावात गेल्या पाच दशकांपासून रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. जनुना हे गाव आदिवासी समाजाचे असून, स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे उलटूनही सरकारकडून तिथे पक्क्या रस्त्याची सोय करण्यात आलेली नाही. पावसाळ्यात संपूर्ण रस्ता चिखलात बुडतो. अशा स्थितीत अनेक वेळा गरोदर महिलांची प्रसूती रस्त्यावरच झाली आहे, तर आजारी लोकांनाही वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकत नाही.
सुमारे 100 ते 150 लोकसंख्या असलेल्या या गावात रस्त्याअभावी संपूर्ण गाव विकासापासून वंचित राहिला आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वारंवार साकडे घातले गेले तरी त्याकडे कोणतेही लक्ष दिले गेलेले नाही. गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “अशा गंभीर समस्येकडे लक्ष न देणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कसले?” असा सवाल उपस्थित केला आहे.
देशात एकीकडे समृद्धी महामार्गाचे जाळे निर्माण केले जात आहे, तर दुसरीकडे अजूनही अनेक गावांमध्ये रस्त्याअभावी सामान्य नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. जनुना-वरुडबिबी या अवघ्या दोन किलोमीटरच्या रस्त्याच्या अभावामुळेच एका वृद्ध रुग्णाला चिखलातून खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. ही घटना शासनाच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
या परिस्थितीत तातडीने लक्ष न दिल्यास आणखी मोठे अनर्थ घडू शकतात. शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने रस्त्यांच्या विकासाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, ही मागणी आता जोर धरत आहे.