व्हिसाची मुदत संपली; पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई, बांगलादेशी महिला ताब्यात
व्हिसाची मुदत संपली; पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई, बांगलादेशी महिला ताब्यात
पिंपरी-चिंचवडमध्ये व्हिसाची मुदत संपूनही अवैध वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलेवर दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) कारवाई केली. फातिमा अमजद अख्तर उर्फ माला विट्ठल डावखर (वय ३५) या महिलेला ताब्यात घेतले असून ती गेल्या सात वर्षांपासून भारतात राहत होती.
सायली मेमाणे
५ ऑक्टोबर २०२५ : पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरातून दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) केलेल्या कारवाईत एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेकडे असलेल्या व्हिसाची मुदत अनेक वर्षांपूर्वीच संपली होती, तरीही ती भोसरी परिसरात अवैधपणे राहत होती. तिला ताब्यात घेण्यात आले असून, तिच्या पार्श्वभूमीचा आणि भारतातील वास्तव्याचा तपास सध्या सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव माला विट्ठल डावखर उर्फ फातिमा अमजद अख्तर (वय ३५) असं असून, ती मूळची बांगलादेशातील रहिवासी आहे. ती गेल्या सात ते आठ वर्षांपासून भारतात राहत होती. सुरुवातीला ती कामाच्या शोधात भारतात आली होती आणि विविध घरांमध्ये घरकाम करून आपला उदरनिर्वाह करत होती. मात्र व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती भारतातच राहत असल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत राहात होती. स्थानिक नागरिकांनी संशयित हालचालींबाबत माहिती दिल्यानंतर ATS पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान समजले की, ती महिला बांगलादेशची असून तिचा व्हिसा किमान सहा वर्षांपूर्वी संपला आहे. त्यानंतर तिने बनावट ओळखपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य सुरू ठेवले होते.
दहशतवाद विरोधी पथकाने तिला ताब्यात घेतल्यानंतर तिच्या कागदपत्रांची आणि संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी तिच्या मोबाईलमधील संपर्क, कॉल रेकॉर्ड आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीचा तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, ती कोणत्याही संघटित गुन्हेगारी किंवा दहशतवादी संघटनेशी जोडलेली नाही, मात्र परदेशी नागरिक असूनही इतक्या दीर्घकाळ भारतात अवैधपणे राहिल्याने चौकशी अधिक गंभीरपणे केली जात आहे.
या प्रकरणात पोलिसांना काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचाही संशय आहे, कारण या महिलेनं एवढ्या वर्षांपर्यंत स्थानिक ओळख निर्माण करून नागरिकांसारखी वास्तव्य कशी केली, हे तपासाचं प्रमुख कोडं ठरलं आहे. तिच्याकडे आधार कार्ड आणि काही अन्य दस्तऐवज आढळल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे.
दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी म्हणाले, “या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने सुरू आहे. महिलेची खरी ओळख, भारतात येण्याचा मार्ग आणि तिच्या संपर्कातील लोकांची माहिती मिळवली जात आहे. जर कोणत्याही अधिकाऱ्याने जाणूनबुजून दुर्लक्ष केले असेल, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई होईल.”
या घटनेनंतर पुणे परिसरात बांगलादेशी आणि इतर परदेशी नागरिकांच्या वास्तव्यासंदर्भात पुन्हा एकदा पडताळणी मोहीम राबवली जाणार असल्याचे समजते. यापूर्वीही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते.
या कारवाईमुळे शहरातील सुरक्षेविषयीचे प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत. पोलिस आणि प्रशासनाकडून परदेशी नागरिकांच्या तपासणी आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत अधिक काटेकोरपणा आणण्याचे संकेत मिळत आहेत.