शरद पवार : “माध्यमांवर सत्ताधाऱ्यांची करडी नजर, फोन ताबडतोब फिरवले जातात” – शरद पवारांची सरकारवर जोरदार टीका
शरद पवारांची सरकारवर जोरदार टीका
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर माध्यमस्वातंत्र्यावर गळचेपी केल्याचा गंभीर आरोप केला. “विरोधात काही छापले की तात्काळ फोन फिरतात,” असे त्यांनी म्हटले.
सायली मेमाणे
पुणे ३ जुलै २०२५ : मुंबई : “सध्या दिल्लीत आणि देशभरात सत्ताधाऱ्यांची माध्यमांवर करडी नजर आहे. सरकारविरोधात काही बातम्या छापल्या गेल्या की, ताबडतोब फोन फिरवले जातात. जाहिराती रोखल्या जातात. माध्यमस्वातंत्र्याची ही गळचेपी अस्वस्थ करणारी आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर घणाघात केला. मुंबई मराठी पत्रकार संघात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या शर्मिला कलगुटकर यांना स्वातंत्र्यसैनिक मनोहर चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या वेळी शरद पवार यांनी आपल्या ५७ वर्षांच्या राजकीय वाटचालीतील पत्रकारितेतील अनुभव शेअर केले. आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य, आणीबाणीतील वर्तमानपत्रांचा सरकारविरोधातील भूमिका यावरही त्यांनी भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “आणीबाणीच्या काळात काही दैनिकांनी अग्रलेख जागा मोकळी ठेवून निषेध नोंदवला होता. इंदिरा गांधींनी नंतर ती चूक मान्य करत माफी मागितली आणि लोकांनी त्यांना पुन्हा निवडून देऊन क्षमा केली.”
पवार पुढे म्हणाले की, “आज मात्र ५० वर्षांनंतरही त्या गोष्टी उकरून सत्ताधाऱ्यांकडून इंदिरा गांधींवर टीका केली जाते. पण आज सत्तेवर असलेले ज्या प्रकारे माध्यमांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना इंदिरा गांधींवर टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे का? दिल्लीतून काही नेते दररोज वर्तमानपत्रांतील बातम्यांचे परीक्षण करतात. काही विरोधात छापले की लगेचच संबंधितांना फोन केला जातो. जाहिरात बंदीचा वापर करून दबाव टाकला जातो.”
या वक्तव्यामुळे पवारांनी माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणले आहे. पत्रकार परिषदेतील त्यांच्या भाषणाने उपस्थित पत्रकारांमध्ये खळबळ निर्माण केली असून, माध्यमांवरील दबावासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना नवी धार मिळाली आहे.