हडपसर पोलिसांची मोठी कामगिरी: वाहन चोरीप्रकरणी ५ आरोपींना अटक, ११ दुचाकी जप्त

0
हडपसर पोलिसांची मोठी कामगिरी: वाहन चोरीप्रकरणी ५ आरोपींना अटक, ११ दुचाकी जप्त

हडपसर पोलिसांची मोठी कामगिरी: वाहन चोरीप्रकरणी ५ आरोपींना अटक, ११ दुचाकी जप्त

हडपसर पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणी ३ आरोपी व २ विधीसंघर्षितांना अटक करत ११ दुचाकी हस्तगत केल्या. एकूण ११ गुन्हे उघड, १२.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे २९ जुलै २०२५ : पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या तीन आरोपी व दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे १२ लाख ३० हजार रुपये इतकी असून, ही कारवाई २० जुलै २०२५ ते २७ जुलै २०२५ दरम्यान करण्यात आली. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहिम राबवण्यात आली.

या कारवाईपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन केले होते. वरिष्ठांच्या सूचना लक्षात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध बैठकांद्वारे तपासाची दिशा ठरवली होती. त्यानुसार पथकाने आरोपी अमन ऊर्फ परश्या भोला तिवारी (वय १९), मोहम्मद अशरफअली ईम्तीयाजअली अजमेरी (वय २०), प्रणव गणेश जमादार (वय २०) आणि दोन विधीसंघर्षित बालक यांना अटक केली. हे आरोपी पुणे शहरातील हडपसर, खराडी आणि वडगावशेरी परिसरात राहणारे आहेत.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून २ बुलेट, २ ड्यूक, १ यामाहा एफझेड, ४ स्प्लेंडर आणि २ अॅक्टीवा अशा ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत हडपसर पोलीस ठाण्यातील ५, मुंढवा पोलीस ठाण्यातील २, बंडगार्डन, विमाननगर, विश्रामबाग आणि देहूरोड पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी १ गुन्हा असे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी अत्यंत बारकाईने काम करत चोरट्यांचा मागोवा घेतला.

सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व) श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परि-५ डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांनी केले असून, त्यांच्या सोबत पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, आणि इतर पोलीस कर्मचारी सहभागी होते.

या कारवाईमुळे पुणे शहरातील वाहन चोरीप्रकरणी एक मोठा गुन्हेगारी साखळी उघड झाली आहे. पोलिसांची ही तडाखेबंद कामगिरी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. तपास पथकाच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारांचा बंदोबस्त करत महागड्या दुचाकी पुन्हा मूळ मालकांकडे परतवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, नागरिकांनी देखील वाहन चोरी किंवा संशयास्पद हालचालीबाबत तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed