अमोल बालवडकर प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची विजयी संकल्प सभा उत्साहात
अमोल बालवडकर
अमोल बालवडकरांचे भावनिक भाषण, अजित पवारांचा पुणे महापालिकेच्या अपयशी कारभारावर हल्लाबोल
०५ जानेवारी २०२६ : प्रभाग क्रमांक ९ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित विजयी संकल्प सभेत कार्यकर्ते, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. संपूर्ण सभेचे वातावरण उत्साहपूर्ण होते. या वेळी अमोल रतन बालवडकर यांच्या स्फोटक व भावनिक भाषणाने उपस्थितांना भारावून टाकले.
अमोल बालवडकर यांनी गेली अकरा वर्षे पक्षवाढ व समाजसेवेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाचा तीव्र शब्दांत निषेध केला. शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारण्याचा प्रकार हा सामान्य कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रयत्न असून तो राजकीय हत्येसारखा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उमेदवारी नाकारल्यानंतर निर्माण झालेला मानसिक संघर्ष, कुटुंबीयांना काय सांगायचे, असा प्रश्न उभा राहिल्याचा अनुभवही त्यांनी मांडला.
बालवडकर यांनी सांगितले की, त्या निर्णायक क्षणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला आणि परिस्थिती बदलली. “अजितदादांनी माझ्यावर अन्याय झाल्याचे मान्य करून चर्चेसाठी बोलावले. त्या एका भेटीत मला राजकीय पुनर्जन्म मिळाला,” असे ते म्हणाले. कार्यकर्ता विरुद्ध नेत्याची ही लढाई असून आजही कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे अजित पवार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते, खड्डे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, अनियमित पाणीपुरवठा व वाढते प्रदूषण यामुळे पुणेकर त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्य व शिक्षण हे नागरिकांचे मूलभूत हक्क असून त्यासाठी सक्षम आणि जबाबदार नेतृत्व आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार गायत्री मोहन मेढे, बाबुराव दत्तोबा चांदेरे, पार्वती अजय निम्हण आणि अमोल रतन बालवडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. जनतेला परिवर्तन हवे असल्यास या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
विजयी संकल्प सभेमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, येणाऱ्या निवडणुकीत घड्याळ चिन्हावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information