आंबोली कावळेसाद पॉईंटवर भीषण दुर्घटना! कोल्हापूरचा पर्यटक 400 फूट दरीत बेपत्ता
कोल्हापूरचा पर्यटक 400 फूट दरीत कोसळला. शोध मोहीम सुरू
आंबोलीतील कावळेसाद पॉईंटवर फोटो घेताना कोल्हापूरचा पर्यटक 400 फूट दरीत कोसळला. शोध मोहीम सुरू; पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ प्रयत्नशील.
सायली मेमाणे
आंबोली २८ जून २०२५ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कावळेसाद पॉईंटवर शुक्रवार (२७ जून) रोजी एक भीषण अपघात घडला. वर्षा पर्यटनासाठी कोल्हापूरहून आलेले ४५ वर्षीय राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी, कोल्हापूर) हे पर्यटक ४०० फूट खोल दरीत कोसळून बेपत्ता झाले आहेत. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. रात्री उशिरापर्यंत पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवली, मात्र अद्याप पर्यटकाचा ठावठिकाणा लागलेला नाही. आता ही शोधमोहीम शनिवारी सकाळपासून पुन्हा राबवली जाणार आहे.
राजेंद्र सनगर हे कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एकूण १९ जणांच्या गटासोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. सकाळी आंबोली मुख्य धबधबा पाहिल्यानंतर दुपारी हे सर्व पर्यटक कावळेसाद पॉईंट येथे गेले. पर्यटनाचा आनंद घेत असताना आणि फोटोशूट सुरू असताना, राजेंद्र सनगर हे रेलिंगला पाठ लावून उभे असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट खोल दरीत कोसळले.
घटनेनंतर इतर सहकाऱ्यांनी आणि स्थानिक दुकानदारांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस आणि गेळे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन शोधमोहीम सुरू केली. मात्र दरीतील घनदाट जंगल, पावसामुळे वाढलेली निसरडी जमीन आणि कमी झालेली दृश्यमानता यामुळे रात्री उशिरापर्यंत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.
आंबोली परिसरातील अनेक पर्यटनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने रेलिंग, सूचना फलक आणि मार्गदर्शक कर्मचारी असले तरी पर्यटकांकडून वारंवार निष्काळजीपणा आढळतो. प्रशासन आणि पोलिसांकडून वेळोवेळी सूचनाही दिल्या जातात की, धोकादायक भागात जाऊ नये, रेलिंगला टेकून फोटो काढू नये, किंवा स्लीपींग ट्रॅकवर फिरू नये. मात्र अशा घटनांवरून दिसून येते की, या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास किती गंभीर परिणाम भोगावे लागतात.
राजेंद्र सनगर यांच्या शोधासाठी पुन्हा एकदा शनिवारी स्थानिक बचाव पथक, पोलीस, वनविभाग आणि गरज पडल्यास एनडीआरएफकडून मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही घटना केवळ व्यक्तिगत दुर्घटना न राहता, पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करते.
वर्षा पर्यटनाचा हंगाम सुरू होत असतानाच अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पर्यटकांनी अशा घटनांपासून धडा घेऊन सावधगिरी बाळगण्याची नितांत गरज आहे.