आजारी कोंबड्या घेण्यावरून वाद; पोल्ट्री कामगारांकडून मारहाण, वाहनचालकाचा मृत्यू

0
इंदापूरमध्ये पोल्ट्री कामगारांकडून चालकाला मारहाण

इंदापूरमध्ये पोल्ट्री कामगारांकडून चालकाला मारहाण

इंदापूरमध्ये पोल्ट्री कामगारांनी आजारी कोंबड्यांवरून वाद घालून चालकाला मारहाण केली. गंभीर दुखापतीमुळे पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू.

सायली मेमाणे

इंदापूर ८ जुलै २०२५ :इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं. १ येथे कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या ५२ वर्षीय वाहनचालकावर पोल्ट्रीतील चार कामगारांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. चालक रियाज चुन्नुमियाँ जागिरदार यांनी लंगड्या व आजारी कोंबड्या गाडीत न भरण्याबाबत सूचना दिली होती, त्यावरून वाद झाला आणि चार आरोपींनी त्यांच्यावर डोक्यावर जबरदस्त मारहाण केली.

जागिरदार हे प्रिमियम चिक्स लि. या पोल्ट्री कंपनीसाठी कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या जमीर इक्बाल शेख यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करत होते. दि. ५ जुलै रोजी ते पोल्ट्री चालक विशाल सूर्यवंशी यांच्या गलांडवाडी येथील फार्मवर कोंबड्या भरण्यास गेले होते. रात्री सव्वा १२ च्या सुमारास, त्यांनी पोल्ट्रीतील कामगारांना आजारी व लंगड्या कोंबड्या गाडीत टाकू नका, दुकानदार अशा कोंबड्या घेत नाहीत, अशी सूचना दिली. यावरून चौघांशी वाद वाढला.

आरोपी निखील जाधव, विकी नलावडे (दोघे रा. गलांडवाडी नं. १), लहु शिंदे, विशाल कांबळे (दोघे रा. शिरसोडी) या चौघांनी जागिरदार यांना “लंगड्या झाल्या म्हणून सांगायचं” असं म्हणत कडाडून वाद घातला. त्यानंतर त्यांनी जागिरदार यांच्या डोक्यावर मारहाण करत त्यांना जागीच बेशुद्ध केले. नंतर त्यांना बारामतीच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, ६ जुलै रोजी डोक्यात झालेल्या अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी जागिरदार यांचे मेव्हणे आसिफ यूनुस शेख यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे पुढील तपास करत आहेत.

ही घटना केवळ वैयक्तिक वादापुरती मर्यादित राहिली नसून पोल्ट्री उद्योगातील कामकाजात होणाऱ्या अनियमिततेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करते. वाहनचालकांनी पोल्ट्री उत्पादकांच्या गुणवत्तेची जबाबदारी घेतली असताना, संबंधित कामगारांनी हल्ला करणे ही गंभीर बाब असून दोषींवर कडक कारवाई होण्याची मागणी होत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed