एसटीच्या ताफ्यात आणखी ८३०० नव्या बस! ३x२ आसनी बससह स्मार्ट आणि व्होल्वो गाड्या लवकरच सेवेत

0
एसटीच्या ताफ्यात आणखी ८३०० नव्या बस! ३x२ आसनी बससह स्मार्ट आणि व्होल्वो गाड्या लवकरच सेवेत

एसटीच्या ताफ्यात आणखी ८३०० नव्या बस! ३x२ आसनी बससह स्मार्ट आणि व्होल्वो गाड्या लवकरच सेवेत

एसटी महामंडळाचा प्रवासी सोयीसाठी मोठा निर्णय — डिसेंबर २०२६ पर्यंत ८३०० नवीन बस ताफ्यात दाखल होणार. ३x२ आसनी साध्या बस, स्मार्ट बस, मिनी आणि व्होल्वो गाड्यांचा समावेश.

सायली मेमाणे

पुणे २८ ऑक्टोबर २०२५ : राज्यातील प्रवाशांसाठी सुखद बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ताफ्यात आता तब्बल ८३०० नव्या बसगाड्यांची भर पडणार आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा ताण कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील संपर्क सुधारण्यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. या नव्या बसगाड्या डिसेंबर २०२६ पर्यंत टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होतील.

सध्या एसटी महामंडळाकडे १४ हजार बसगाड्या आहेत. त्यापैकी १२ हजार ५०० गाड्या दररोज राज्यभर प्रवासी वाहतूक करतात, तर उर्वरित गाड्या नादुरुस्त स्थितीत आगारात उभ्या आहेत. दररोज सुमारे ५५ लाख प्रवासी एसटीच्या माध्यमातून प्रवास करतात. विद्यमान गाड्यांची संख्या आणि वाढती प्रवासी मागणी लक्षात घेता, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दरवर्षी किमान ५ हजार नवीन बस ताफ्यात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे.

या नव्या गाड्यांमध्ये साध्या, स्मार्ट, मिनी तसेच व्होल्वो श्रेणीतील आलिशान बसगाड्यांचा समावेश असेल. विशेष म्हणजे, साध्या बसेस आता ३x२ आसनी असतील, म्हणजेच या गाड्यांमध्ये आसनक्षमता वाढेल आणि प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होईल. ग्रामीण व तालुका स्तरावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी साध्या बसच्या ३ हजार गाड्यांची खरेदी प्रक्रिया सुरू असून निविदा टप्प्यात आहे.

महामंडळाने जिल्हा आणि तालुका मार्गांसाठी नवीन “स्मार्ट बस” सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अशा प्रमुख शहरांतून जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गांवर या आधुनिक स्मार्ट बस धावणार आहेत. या बसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच चालकांना झोप येत असल्यास अलार्म देणारी ‘ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम’ असे अत्याधुनिक फीचर्स असतील. या बसच्या खरेदीसाठी पाच हजार गाड्यांचे नियोजन असून, त्यापैकी एक हजार बस पुढील वर्षभरात रस्त्यावर उतरतील.

याशिवाय, पर्यटक आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी वॉल्वो श्रेणीतील ५० स्लिपर आणि १५० आसनी बसगाड्यांची खरेदी केली जाणार आहे. मुंबई-पुणे, नाशिक-पुणे, गोवा, कोकण आणि नागपूर मार्गांसाठी या बस तैनात केल्या जातील. प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी या बसमध्ये शयनयान सुविधा, वायफाय, चार्जिंग पोर्ट आणि एसी यंत्रणा बसवली जाईल.

एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षांत अनेक सवलतींच्या योजना जाहीर केल्या आहेत — विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती दिल्या जात आहेत. आता नव्या बसगाड्यांच्या ताफ्यामुळे राज्यभर प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि आधुनिक सेवा उपलब्ध होईल. ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा मोठा फायदा होणार असून, एसटी प्रवास आणखी सोयीस्कर आणि विश्वासार्ह होण्याची शक्यता आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *