कऱ्हा–नीरा उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी; १००० कोटींच्या प्रकल्पामुळे जिरायती भागाला दिलासा – अजित पवार

0
कऱ्हा–नीरा उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी; १००० कोटींच्या प्रकल्पामुळे जिरायती भागाला दिलासा – अजित पवार

कऱ्हा–नीरा उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी; १००० कोटींच्या प्रकल्पामुळे जिरायती भागाला दिलासा – अजित पवार

कऱ्हा–नीरा उपसा सिंचन योजना या पंचवार्षिक योजनेत मार्गी लागणार असून २.५ टीएमसी पाणी नीरा नदीतून आणले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुणे 2५ जानेवारी २०२६ : बारामती तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कऱ्हा–नीरा उपसा सिंचन योजना प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. हा प्रकल्प सध्याच्या पंचवार्षिक योजनेत पूर्णत्वास नेण्यात येणार असून, या माध्यमातून तालुक्यातील जिरायती भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. सुमारे १००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, नीरा नदीतून अडीच टीएमसी पाणी उचलून सिंचनासाठी वापरण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ बारामती तालुक्यातील श्री कत्र कण्हेरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करताना आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित पवार यांनी सांगितले की, कऱ्हा–नीरा उपसा सिंचन योजनेमुळे जानाई–शिरसाई आणि पुरंदर सिंचन योजनांच्या मधल्या टप्प्यातील जिरायती भाग सिंचनाखाली येणार आहे. सध्या नीरा नदीतून वाहून जाणारे पाणी योग्य पद्धतीने वापरात आणून शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेली शेती अधिक शाश्वत होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

बारामती तालुक्याचे परिवर्तन करण्याचा आपला संकल्प असल्याचे सांगत अजित पवार म्हणाले की, या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याचा विकास ऐतिहासिक ठरेल. गेल्या काही वर्षांत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवे मापदंड ठरवून पायाभूत सुविधा, शेती, पाणीपुरवठा आणि सामाजिक विकासावर भर देण्यात आला आहे. हे परिवर्तन जनतेच्या सहकार्यामुळेच शक्य झाले असून, हा विश्वास कधीही विसरणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी निवडणुकांच्या संदर्भात बोलताना सांगितले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अनेक सक्षम आणि तोडीस तोड उमेदवार असूनही सर्वांना उमेदवारी देणे शक्य नसते. मात्र, सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. जातीपातीचा विचार न करता गुणवत्तेला संधी देण्याची भूमिका आपली कायम राहिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनुसूचित जातीतील उमेदवारांना विविध ठिकाणी संधी दिल्याचे उदाहरण देत अजित पवार यांनी गैरसमज पसरवू नयेत, असे आवाहन केले. बारामती शहरासह ग्रामीण भागातही विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे त्यांनी सांगितले. लाडक्या बहिणींचे सहकार्यही आगामी निवडणुकांमध्ये महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रचार सभेला अनुपस्थित राहिलेल्या काही पदाधिकाऱ्यांवर अजित पवार यांनी कानपिचक्या देत नाराजी व्यक्त केली. पक्षाने संधी दिल्यानंतरही कार्यक्रमांकडे पाठ फिरवणे योग्य नसल्याचे सांगत संबंधितांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली. कऱ्हा–नीरा उपसा सिंचन योजना मार्गी लागल्यास बारामती तालुक्याच्या शेती आणि विकासाला नवे बळ मिळणार असून, हा प्रकल्प परिसराच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *