कितीही विरोध झाला तरी अजितदादा एकटेच पुरेसे – रूपाली पाटलांचा प्रखर संदेश

1
'एकटा अजितदादा पुरेसा' म्हणत विरोधकांवर साधला निशाणा.

'एकटा अजितदादा पुरेसा' म्हणत विरोधकांवर साधला निशाणा.

Ajit Pawar यांच्यावर सातत्याने होणाऱ्या टीकेवर रूपाली पाटलांनी घेतला ठाम पवित्रा; ‘एकटा अजितदादा पुरेसा’ म्हणत विरोधकांवर साधला निशाणा.

सायली मेमाणे

१७ जून २०२५ : राज्यातील राजकारण सध्या उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या नावाभोवती फिरताना दिसत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या निधीपासून ते पुलाच्या दुर्घटनेपर्यंत, कोणतीही घटना घडली तरी जबाबदार ठरणारे एकच नाव म्हणजे अजित पवार. सध्या त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी या टीकांवर थेट आणि ठाम प्रत्युत्तर देत, ‘कितीही समोर येऊ द्या, अजितदादा एकटेच बास’ असा घणाघात केला आहे.

सुरुवात झाली ती सामाजिक न्याय विभागाच्या निधीच्या कपातीवरून. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सारथी आणि महाज्योती यांना वेगळी वागणूक दिल्याचा आरोप केला. नंतर कुंडमळा पुलाच्या दुर्घटनेनंतर अजित पवार घटनास्थळी का गेले नाहीत, हा सवाल उपस्थित करण्यात आला. त्याचदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत, ‘धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून मोठे झाले’ असा आरोप केला, जेव्हा प्रत्यक्षात अजित पवारांनी ‘चोरून’ नव्हे तर ‘सोडून’ असा उल्लेख केला होता. या अशा सूक्ष्म वाक्यांची चूक पकडत सातत्याने एकाच नेत्याला लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रूपाली पाटील यांच्या मते, हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक रचलेला आहे. कोणतीही घटना असो, त्यात पक्ष किंवा मंत्रीमंडळात अनेकांचा सहभाग असतो, तरीही समाजात एक चित्र रंगवले जाते की, सर्व काही अजित पवार यांच्यामुळे घडते. अगदी एखाद्या सामान्य कुटुंबातील वादही त्यांच्या नावावर लावला जातो. ही एक प्रकारची राजकीय बदनामीची मोहीम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे लोक, हे एककलमी अजेंडा घेऊन राष्ट्रवादीविरोधातच का पेटून उठतात, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज्यातील अनेक आजी-माजी आमदार, विविध सामाजिक संघटनांचे नेते आणि जिल्हास्तरीय प्रभावशाली लोक अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. यामागे त्यांच्या नेतृत्वाची शिस्त, जनतेशी संवादाची शैली आणि कार्यक्षमतेचा विश्वास आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या 41 जागा या केवळ आकडे नाहीत, तर महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आहे.

अजित पवार यांचे नेतृत्व म्हणजे केवळ शिस्त नव्हे, तर धोरणात्मक स्पष्टता, प्रशासकीय अनुभव आणि जमीनीवरचा प्रभाव आहे. ही सगळी बलस्थाने त्यांच्या विरोधकांना अस्वस्थ करत आहेत. त्यांच्या सतत वाढणाऱ्या प्रभावामुळे इतर नेत्यांमध्ये असुरक्षितता आणि असूया निर्माण झाली आहे, हे नाकारता येणार नाही. त्यामुळेच, टीका करून त्यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण रूपाली पाटलांच्या म्हणण्यानुसार, ‘कितीही समोर येऊ द्या, अजितदादा एकटेच बास’ – हेच अखेरचं सत्य आहे. विरोधकांनी कितीही प्रश्न उपस्थित केले तरी अजित पवारांचं वजन महाराष्ट्राच्या राजकारणात अधिकाधिक वाढतच जाणार आहे.

शेवटी, राजकारणात आरोप आणि प्रत्यारोपांची लढाई नवी नाही, परंतु ज्या प्रकारे अजित पवार यांना लक्ष्य केलं जातं, ते एका नीतीपूर्व हेतूचा भाग असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. आता या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची पुढील राजकीय वाटचाल किती ठाम आणि प्रबळ होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

1 thought on “कितीही विरोध झाला तरी अजितदादा एकटेच पुरेसे – रूपाली पाटलांचा प्रखर संदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed