कॅप्स कॅफेवर गोळीबार प्रकरण : कपिल शर्माच्या टीमकडून पहिली प्रतिक्रिया, ‘आम्ही हार मानली नाही’
कॅनडामधील ‘कॅप्स कॅफे’वर गोळीबार, कपिल शर्माच्या टीमकडून पहिली प्रतिक्रिया
कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅप्स कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर त्याच्या टीमकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हिंसेला न झुकता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची तयारी दर्शवली आहे.
सायली मेमाणे
पुणे ११ जुलै २०२५ : Kapil Sharma Cafe Firing: कपिल शर्माच्या नव्याने सुरू झालेल्या ‘कॅप्स कॅफे’वर 10 जुलै रोजी रात्री कॅनडाच्या सरे (Surrey) शहरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपत्तीचे नुकसान झाले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर कपिल शर्माच्या टीमकडून आता अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यांनी हा प्रसंग ‘हृदयद्रावक’ असल्याचे नमूद केले असून, धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.
कॅफेच्या सोशल मीडियावरून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “हा संदेश आम्ही मनापासून देत आहोत. चवदार कॉफी आणि मैत्रीपूर्ण संवादाच्या माध्यमातून समुदायाला एकत्र आणण्याचे स्वप्न आम्ही बाळगले होते. हिंसेमुळे या स्वप्नांचा भंग झाल्याची भावना अत्यंत दुःखद आहे. आम्ही सावरण्याचा प्रयत्न करत आहोत, पण हार मानलेली नाही.”
या घटनेनंतर कॅफेच्या सोशल मीडिया हँडलवरून #supportkapscafecanada हा हॅशटॅग वापरत पाठिंबा मागण्यात आला. “तुमचे प्रेमळ शब्द, प्रार्थना आणि डीएममध्ये शेअर केलेल्या आठवणी आम्हाला बळ देत आहेत,” असेही टीमने नमूद केले. “कॅफेचे अस्तित्व विश्वासावर आधारित आहे आणि हिंसेविरोधात आपण सर्वांनी एकत्र यावे,” अशी भावना टीमने व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, “चांगल्या वेळेत पुन्हा भेटूया आणि कॅप्स कॅफेमध्ये सर्वांचे स्वागत उबदारपणे करू.”
10 जुलै रोजी रात्री दोन अज्ञात हल्लेखोरांनी कारमधून येत रेस्टॉरंटवर 9 गोळ्या झाडल्या. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी हरजीत सिंग लड्डी नावाच्या खलिस्तानी दहशतवाद्याने घेतली आहे, जो जर्मनीस्थित बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या संघटनेशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्माच्या एका जुन्या कॉमिक शोमध्ये निहंग शिख समुदायाविरोधात काही आक्षेपार्ह विनोद केल्याचा राग ठेवूनच हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेनंतर स्थानिक पोलीस – सरे पोलीस आणि डेल्टा पोलीस – यांनी तपास सुरू केला असून, कपिलच्या टीमकडून त्यांच्या तत्परतेचे आभार मानण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे ‘कॅप्स कॅफे’ आणि कपिल शर्मा दोघेही चर्चेत आले आहेत.