क्रॉफर्ड मार्केट कोळी बाजारासाठी कोळी समाजाची 400 कोटींची तयारी; आंतरराष्ट्रीय मासळी बाजार उभारण्याचा निर्धार

0
क्रॉफर्ड मार्केट कोळी बाजारासाठी कोळी समाजाची 400 कोटींची तयारी

क्रॉफर्ड मार्केट कोळी बाजारासाठी कोळी समाजाची 400 कोटींची तयारी

मुंबईतील क्रॉफर्ड मासळी बाजार वाचवण्यासाठी कोळी समाजाने 400 कोटी रुपये खर्चून 30 वर्षांचा भाडेकरार करण्याची तयारी दर्शवली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मासळी बाजारासह सामाजिक उपक्रम राबवण्याचे नियोजन.

सायली मेमाणे

मुंबई ८ जुलै २०२५ : क्रॉफर्ड मार्केट कोळी बाजार वाचवण्यासाठी कोळी समाज सज्ज; 400 कोटींचा भाडेकरार प्रस्ताव, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मासळी बाजाराची योजना

मुंबई – मुंबईतील कोळी समाजाने क्रॉफर्ड मार्केटजवळील छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार वाचवण्यासाठी मोठा आर्थिक निर्णय घेतला आहे. बाजारासाठी ३० वर्षांचा भाडेकरार करण्यासाठी ४०० कोटी रुपये भरण्याची तयारी कोळी समाजाने दर्शवली असून, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना याबाबतचे अधिकृत निवेदनही देण्यात आले आहे.

सदर बाजार सुमारे पाच दशके अस्तित्वात असून सध्या ३४८ परवानाधारक व्यापारी येथे मासळी विक्री करतात. मात्र अलीकडे या भूखंडावरील लिलावामुळे मासळी बाजाराचे भवितव्य धोक्यात आल्याची भीती निर्माण झाली आहे. खासगी कंपनीला ३६९ कोटी रुपयांना भूखंड देण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर कोळी समाजाने अधिक बोली देण्याची तयारी दाखवत हा भूखंड सामाजिक हितासाठी कोळी समाजालाच द्यावा, अशी मागणी केली आहे.

कोळी समाजाने मासळी बाजाराच्या पुनर्विकासासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा मासळी हब उभारण्यासाठी १०० कोटींची अतिरिक्त तरतूद करण्याचीही तयारी दर्शवली आहे. विकासानंतर मिळणाऱ्या उत्पन्नातून कोळी समाजातील ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन, शिक्षणासाठी मदत, रुग्णांना वैद्यकीय सुविधा आदी उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे.

कोळी समाजाचे प्रतिनिधी देवेंद्र तांडेल यांनी स्पष्ट केले की, मुंबईतून भूमिपुत्रांना हद्दपार करण्याचा प्रयत्न होत असून त्यांचं उपजीविकेचं साधन हिरावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याविरोधात कोळी समाज एकवटला असून, पालिकेच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून त्यांनी हा भूखंड मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

हा मासळी बाजार फक्त मुंबईपुरता मर्यादित नसून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालसारख्या राज्यांतून मासळी या बाजारात संकलित केली जाते. त्यामुळे या जागेचा उपयोग करून मासळी व्यापारासाठी जागतिक दर्जाचे केंद्र उभारण्याचा हेतू असून, कोळी समाजाच्या हक्कासाठी हा भूखंड खासगी उद्योजकांऐवजी भूमिपुत्रांनाच मिळावा, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *