खासदार मेधा कुलकर्णींचा भाजपवर निशाणा; पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांवर व्यक्त केली तीव्र नाराजी
खासदार मेधा कुलकर्णींचा भाजपवर निशाणा
राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील वाहतूक, नदी सुधार प्रकल्प, रूफटॉप हॉटेल्स व उड्डाणपुलांच्या रखडलेल्या कामांबाबत प्रशासन व अप्रत्यक्षपणे भाजपवरच टिका केली.
सायली मेमाणे
पुणे २८ जून २०२५ : पुणे शहरातील नागरी समस्या व विकास कामांवरील रखडपट्टीबाबत भाजपच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी थेट प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी व्यक्त केलेली ही नाराजी अप्रत्यक्षपणे भाजपच्याच कारभारावर टीका असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शुक्रवारी त्यांनी पुण्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन वाहतूक कोंडी, नदी सुधार प्रकल्प, अनधिकृत रूफटॉप हॉटेल्स, उड्डाणपुलांची रखडलेली कामे, अतिक्रमण आदी विषयांवर चर्चा केली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पुण्याच्या नागरी समस्या, व्यवस्थापनातील त्रुटी आणि प्रशासनाच्या अपयशावर सडेतोड भाष्य केलं.
डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, पुण्यातून हडपसरला पोहचायला जितका वेळ लागतो, तितक्याच वेळात एखादा प्रवासी मुंबईत पोहोचतो, ही पुणेकरांची शोकांतिका आहे. नागरी जीवनमान दिवसेंदिवस खालावत असून विकास आराखड्याची फक्त २५ टक्केच अंमलबजावणी झाली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, रस्त्यांची कामे रखडली आहेत, रुंदीकरण केले गेलेले नाही, आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गंगाधाम चौकात उड्डाणपुलासाठी एक वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही काम सुरु झाले नाही. पुलाच्या कामात अडथळे आणणारे ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण आहेत, असा सवाल करत त्यांनी थेट हा भाग नगरविकास राज्यमंत्री आणि भाजप नेत्या माधुरी मिसाळ यांच्या मतदारसंघात येतो, हे अधोरेखित केलं.
भाजपच्या वतीने नदीकाठ सुधार प्रकल्पाचे श्रेय घेतले जात असले तरी खुद्द भाजपच्या खासदारानेच या प्रकल्पातील त्रुटी दाखवत नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, नाईक बेटाजवळ प्रवाह बंद करून संभाव्य पूरस्थितीला आमंत्रण दिलं जात आहे. नद्या ही हजारो वर्षांची नैसर्गिक ठेव असून, त्यांचे नाल्यांमध्ये रूपांतर होऊ नये, यासाठी नदीकाठावरील परवानग्या ब्ल्यू आणि रेड लाईननुसारच द्याव्यात अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. हे वक्तव्य भाजपच्या अंतर्गतच विरोधाच्या सुरांचा इशारा देणारे मानले जात आहे.
पक्षाच्या सत्तेचे अपयश विचारता त्यांनी प्रशासनालाच जबाबदार धरले. त्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रात ११ आणि राज्यात ९ वर्षे सत्ता असूनही नागरी समस्या सुटत नसल्याचा दोष प्रशासनाचे अपयश आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, मी पक्षाच्या पलीकडे जाऊन पुणेकरांच्या हितासाठी बोलते आहे. आमचे इतर आमदार, खासदारही महापालिका आयुक्तांशी सातत्याने चर्चा करत आहेत, त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे आयुक्तांशी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
कल्याणीनगरमधील अनधिकृत रूफटॉप हॉटेल्स, क्लब्समधील गैरकृत्यांवरही त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ५० पेक्षा अधिक सोसायट्यांनी याविषयी तक्रारी दिल्या असूनही महापालिका व पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नियमबाह्य संगीत, अमली पदार्थांचा वापर आणि शांततेचा भंग यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो, अशीही त्यांनी तक्रार नोंदवली.
एकंदरित पाहता, मेधा कुलकर्णी यांची ही भूमिका केवळ प्रशासनावरची टीका नसून, पुण्यातील विकास कामांबाबत भाजपच्या स्थानिक नेतृत्वाची जबाबदारीही अधोरेखित करणारी आहे. सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नांची गंभीर दखल घेऊन निर्णयक्षम कृती करावी, अशी अपेक्षा पुणेकरांना आहे.