गोव्यातील प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू; दोन सलग ‘बर्ड फ्लू’ निगेटिव्ह अहवालानंतर निर्णय
गोवा प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू
गोव्यातील प्राणी संग्रहालय दोन महिन्यांनंतर पुन्हा सुरू, बर्ड फ्लूचा धोका टळल्याचे दोन सलग निगेटिव्ह अहवालात स्पष्ट..
सायली मेमाणे
२६ जून २०२५ : गोव्यातील एकमेव बॉन्डला प्राणी संग्रहालय तब्बल तीन महिन्यांच्या बंदीनंतर बुधवारी पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जंगलातील दोन वाघिणी (जंगल कॅट्स) आणि तीन सिव्हेट्सच्या अचानक मृत्यूनंतर बर्ड फ्लूचा संशय निर्माण झाला होता. यामुळे १ एप्रिलपासून हे प्राणी संग्रहालय बंद करण्यात आले होते.
वन विभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाय सुरू करत प्रभावित प्राणी ठेवण्याच्या बंदिस्त पिंजऱ्यांना वेगळं केलं आणि प्रेक्षकांचा प्रवेश पूर्णतः बंद केला. गोवा वन विभागाने प्राण्यांचे नमुने भोपाळच्या ICAR – राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्थेला (NIHSAD) पाठवले होते. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार दोन जंगल कॅट्सचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र सिव्हेट्सच्या मृत्यूचं कारण अद्यापही अज्ञात आहे.
बुधवारी उत्तर गोव्याच्या वन व इको-पर्यटन विभागाचे उपसंरक्षक जीस के वर्गीज यांनी आदेश काढत सांगितले की, “ICAR-NIHSAD भोपाळकडून दोन सलग निगेटिव्ह बर्ड फ्लू अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बॉन्डला प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
गोव्याचे वनमंत्री विश्वजित राणे यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत ही माहिती दिली. “सावधगिरी म्हणून काही काळ बंद ठेवण्यात आलेले बॉन्डला झू आता पुन्हा सुरू झाले आहे. NIHSAD भोपाळकडून बर्ड फ्लू निगेटिव्ह प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच हे शक्य झाले. वन विभागाने प्राण्यांची आणि पर्यटकांची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी योग्य निर्णय घेतला,” असे त्यांनी सांगितले.
मुख्य प्रधान वनसंरक्षक कमल दत्ता यांनी स्पष्ट केले की, “वायरसच्या शक्यतेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही झू तात्काळ बंद केले, संक्रमित भागांची निर्जंतुकीकरण प्रक्रिया राबवली आणि इतर प्रतिबंधक उपाय केले. त्यामुळे हा विषाणू संग्रहालयाच्या बाहेर पसरला नाही.”
या कालावधीत सर्व बायो-सुरक्षा उपाय काटेकोरपणे राबवण्यात आले. प्राणी आणि पर्यटकांचे आरोग्य जोपासण्यासाठी वन विभागाने वेळेत निर्णय घेऊन जागरूकतेचे उदाहरण ठेवले आहे. बॉन्डला प्राणी संग्रहालय आता पुन्हा पर्यटकांसाठी खुले झाले असून संपूर्ण परिसराची स्वच्छता आणि निरीक्षण सुरू ठेवले जाणार आहे.