चंद्रपूर मनपा शाळांचा कायापालट! 15 शाळांना ISO मानांकन, 6 डिजिटल स्कूल्स
चंद्रपूर मनपा शाळांचा कायापालट!
चंद्रपूर महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावला; १५ शाळांना ISO प्रमाणपत्र आणि ६ शाळा डिजिटल, शैक्षणिक पायाभूत सुविधा व विद्यार्थी संख्येत मोठी वाढ
सायली मेमाणे
२४ जून २०२५ : चंद्रपूर शहरातील महापालिका शाळांनी आपली ओळख बदलण्यास सुरुवात केली आहे. तीन वर्षांत या शाळांचा चेहरामोहरा पूर्णतः बदललेला दिसत आहे. ग्रीष्मकालीन सुटीनंतर २३ जून रोजी शाळा सुरू झाल्यानंतर “शाळा प्रवेशोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांच्या चेहऱ्यावर शिकण्याची उत्सुकता आणि आनंद स्पष्ट दिसून येत होता.
विशेष म्हणजे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या एकूण २६ शाळांपैकी १५ शाळांना ISO प्रमाणपत्र प्राप्त झाले असून ६ शाळा आधुनिक डिजिटल सुविधांनी सज्ज करण्यात आल्या आहेत. या डिजिटल शाळांमध्ये ई-लायब्ररी, स्मार्ट क्लासरूम, वॉटर कूलर अशा आधुनिक शिक्षणसामग्रीचा समावेश करण्यात आला आहे.
या विकासाच्या केंद्रस्थानी आहेत मनपा आयुक्त विपिन पालीवाल. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, शिक्षण गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साधनसामग्री, पालकांचा शाळांवरील विश्वास आणि विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ याचा परिणाम आज दिसून येतो आहे. आज मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ४२०० वर पोहोचली आहे, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर झालेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात आमदार सुधाकर अडबाले, उपायुक्त संदीप चित्तरवार आणि शिक्षणाधिकारी नागेश नीत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश, वही आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी आमदार अडबाले यांनी घोषणा केली की, “मनपा शाळांमध्ये आधुनिक शिक्षण सुविधा आणण्यासाठी आमदार निधीतून लवकरच संगणक आणि अन्य तांत्रिक साधनं दिली जातील.” शिक्षणाधिकारी नागेश नीत यांनी सांगितले की, “मनपा शाळा आता खासगी शाळांना टक्कर देऊ लागल्या आहेत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि पालकांचा विश्वास हा सरकारी शाळांची गुणवत्ता आणि विश्वासार्हतेचा पुरावा आहे.”
गेल्या वर्षी महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये १६ जूनपासून शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र विदर्भातील प्रचंड उन्हामुळे चंद्रपूर जिल्ह्यात शाळा २३ जूनपासून सुरू करण्यात आल्या. तरीही विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबाबत उत्साह ओसंडून वाहत होता.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz