चेंबूर स्पा रेडमध्ये धक्कादायक खुलासा; बोगस ग्राहकांकडून थेरेपिस्टवर जबरदस्तीचा आरोप
चेंबूर स्पा रेडमध्ये धक्कादायक खुलासा; बोगस ग्राहकांकडून थेरेपिस्टवर जबरदस्तीचा आरोप
चेंबूरमधील युवान थाऊ स्पावर पीटा अंतर्गत झालेल्या रेडनंतर धक्कादायक माहिती समोर; पोलिसांनी ग्राहक बनवून पाठवलेल्या चौघांकडून महिला थेरेपिस्टवर जबरदस्तीचा आरोप.
सायली मेमाणे
पुणे २७ नोव्हेंबर २०२५ : मुंबईतील चेंबूर परिसरात एका स्पावर झालेल्या पोलिस रेडनंतर आता धक्कादायक आरोप समोर आले आहेत. गेल्या महिन्याच्या २७ ऑक्टोबर रोजी युवान थाऊ स्पावर पीटा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या थायलंडच्या आठ तरुणींसह काही महिलांची सुटका केली होती. हा रॅकेट उघड करण्यासाठी पोलिसांनी आखलेल्या विशेष प्लॅनचा भाग म्हणून काही बोगस ग्राहक स्पामध्ये पाठवले होते. मात्र आता या बोगस ग्राहकांपैकी काहींनीच महिला थेरेपिस्टवर जबरदस्ती केल्याचा आरोप उघडकीस आला असून, त्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
घटनेची तक्रार नोंदवणाऱ्या ३८ वर्षीय स्पा थेरेपिस्टनुसार, २७ ऑक्टोबरच्या सायंकाळी तिच्याकडे डीप टिश्यू थेरेपीसाठी एक ग्राहक आला होता. मसाज सुरू असतानाच त्या व्यक्तीने महिलेला अश्लील स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला पॉवरफूल व्यक्ती तसेच ‘पोलिसांचा खास माणूस’ असल्याची धमकी दिली. खोट्या केसमध्ये फसवण्याची भीती दाखवत त्या ग्राहकाने महिलेला बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याने शरीरसंबंधाची मागणीही केली, असे महिलेने स्पष्ट केले आहे.
महिलेच्या तक्रारीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्या दिवशी ग्राहक बनून आलेला हा व्यक्ती हा प्रत्यक्षात पोलिसांनीच स्पावर पाठवलेला बोगस ग्राहक होता. स्पामध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची खात्री करण्यासाठी त्याला पाठवण्यात आले होते. मात्र त्याने ही संधी गैरवापरून महिलेला विवस्त्र केले, असा आरोप तिने केला आहे. या प्रकरणात अधिक भयानक घटना तेव्हा घडली, जेव्हा तीन अनोळखी व्यक्ती त्या रूममध्ये आले आणि नग्न अवस्थेतील महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढले, असेही तिने सांगितले.
युवान स्पावर झालेल्या छाप्यानंतर थायलंडच्या तरुणींसह काही महिलांची सुटका करण्यात आली होती. त्या सर्वांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली होती. मात्र या छाप्यानंतर जवळपास एक महिन्याने महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल करताच प्रकरणात मोठा वळण आले. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवून चौकशीला सुरुवात केली आहे. हे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस यंत्रणेलाही आता या रेडच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चेंबूर परिसरात गेल्या काही महिन्यांत स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली अवैध व्यवसाय वाढत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी करून कारवाई केली आहे. मात्र या प्रकरणातील नवीन खुलास्यामुळे, रेड दरम्यान सहभागी केलेल्या बोगस ग्राहकांवरही नियंत्रणाची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणतेही ऑपरेशन करताना महिलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, आणि अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तींनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे या प्रकरणाने सिद्ध केले आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व बाबींची तपासणी सुरू केली असून, स्पामध्ये तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचे जबाबही घेतले जात आहेत. छापेमारीच्या वेळी ग्राहक म्हणून पाठवण्यात आलेल्या व्यक्तींची ओळख, त्यांची भूमिका, आणि त्यांच्या उपस्थितीत झालेल्या अनुचित कृतींचा सखोल तपास करण्यात येणार आहे. प्रकरण गंभीर असल्याने संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे आरसीएफ पोलिसांनी सांगितले आहे.
ही घटना केवळ एका स्पावर झालेल्या गैरप्रकाराची नसून, छापेमारीच्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या जोखमींबद्दलही महत्त्वाचा इशारा देणारी आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि अशा कारवाईतील पारदर्शकतेसाठी पुढील काळात अधिक कडक नियम लागू होण्याची शक्यता आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information