जालिंदर सुपेकर यांच्यावर 550 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप
जालिंदर सुपेकर यांच्यावर ५५० कोटींच्या मागणीचा आरोप”
पुण्याच्या सावकाराच्या वकिलांचा गंभीर आरोप – जालिंदर सुपेकर यांनी जेलमधील कैद्यांकडून जामिनासाठी 550 कोटी रुपये मागितल्याचे वृत्त.
सायली मेमाणे
पुणे १० जून २०२५ : पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी एका पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी माजी विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर तुरुंगात असलेल्या कैद्यांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मागणी केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमरावती कारागृहात बंद असलेल्या नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्याकडून जामीन मिळवून देण्यासाठी ५५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.
सदर आरोप वकिल निवृत्ती कराड यांनी केला असून त्यांनी याबाबत नागपूर खंडपीठात याचिकाही दाखल केल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते, ही प्रकरण वैयक्तिक सूड आणि आर्थिक फायद्यासाठी उभं करण्यात आले होते.
या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे की, गायकवाड यांच्याकडून जप्त करण्यात आलेली रोकड, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या व्यवहारात देखील आर्थिक गैरव्यवहार झाला. कराड यांच्या दाव्यानुसार, सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त यांनी या मालमत्तेच्या व्यवस्थापनात १०० ते १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा संशय आहे.
अधिक माहितीनुसार, सुपेकर यांनी अमरावती कारागृहातील अधिकाऱ्यांना गायकवाड पित्यापुत्रांवर मानसिक दबाव टाकण्याचे आदेश दिले होते. मात्र काही अधिकाऱ्यांनी हे आदेश पाळले नसल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. हा प्रकार प्रशासनाच्या दडपशाहीचे स्पष्ट उदाहरण म्हणून समोर येत आहे.
तसेच, कारागृहात एका कैद्याने नानासाहेब गायकवाड यांच्यावर धारदार वस्तूने हल्ला केल्याचा प्रकार घडल्याचेही कराड यांनी सांगितले. त्यांच्या मते, या घटनेमागे पूर्वनियोजित साजिश असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुपेकर यांनी या सर्व आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सत्यता तपासणं न्यायालयीन प्रक्रियेचा भाग ठरेल.