जेजे रुग्णालयात MRI सेवा ठप्प; मशीन बंद पडल्याने प्रतीक्षा तीन महिन्यांवर, रुग्णांचे हाल

0
जेजे रुग्णालयात MRI सेवा ठप्प; मशीन बंद पडल्याने प्रतीक्षा तीन महिन्यांवर, रुग्णांचे हाल

जेजे रुग्णालयात MRI सेवा ठप्प; मशीन बंद पडल्याने प्रतीक्षा तीन महिन्यांवर, रुग्णांचे हाल

जेजे रुग्णालयातील एक MRI मशीन बंद पडल्याने तपासणीची प्रतीक्षा 15 दिवसांवरून थेट तीन महिन्यांवर पोहोचली आहे. नायर रुग्णालयातील मशीनही गेल्या वर्षभरापासून बंद असून, सरकारच्या PPP मॉडेलला विद्यार्थी आणि डॉक्टरांचा विरोध वाढतो आहे.

सायली मेमाणे

१३ नोव्हेंबर २०२५ : मुंबईतील जेजे रुग्णालयात आरोग्य सेवेला मोठी खीळ बसली आहे. रुग्णालयातील दोनपैकी एक MRI मशीन बिघाडामुळे पूर्णपणे बंद पडले असून, त्याचा थेट परिणाम MRI तपासणीच्या प्रतीक्षेवर झाला आहे. आधी जिथे तपासणीसाठी केवळ दोन आठवडे वाट पाहावी लागत होती, तिथे आता रुग्णांना तब्बल तीन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. नायर रुग्णालयातील MRI मशीनही गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने तेथील रुग्णांचा भार जेजे रुग्णालयावर पडत आहे आणि त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

दररोज मोठ्या संख्येने रुग्ण MRI तपासणीसाठी येतात. वृद्ध, कॅन्सर रुग्ण, मेंदू किंवा नसांच्या आजारांनी त्रस्त रुग्ण, तसेच लहान मुलांनाही या तपासणीची तातडीची गरज असते. मात्र, लांबलेली प्रतीक्षा यादी पाहता आता अनेक रुग्णांना पुढील वर्षाची तारीख दिली जात आहे. काही गंभीर रुग्णांना सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी महिनोंमहिने थांबता येत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण येत आहे.

बिघडलेली MRI मशीन जवळपास दहा वर्षे जुनी असून ती Windows XP या जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालते. या मशीनसाठी लागणारे DDR-1 RAM सारखे संगणकीय घटक बाजारात सहज उपलब्ध नसल्याने तिची दुरुस्ती करणे जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन नवीन मशीन घेण्याचा किंवा PPP मॉडेल अवलंबण्याचा विचार करत आहे.

मात्र सार्वजनिक-खासगी भागीदारी म्हणजेच PPP मॉडेलच्या निर्णयाला वैद्यकीय विद्यार्थी आणि रेडिओलॉजी विभागातील डॉक्टरांचा कडाडून विरोध आहे. त्यांच्या मते, वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्यासाठी रुग्णांशी प्रत्यक्ष संपर्क असणे अत्यंत आवश्यक आहे. जर MRI आणि CT स्कॅन सेवा पूर्णतः खासगी कंपन्यांच्या ताब्यात गेल्या, तर विद्यार्थ्यांना केवळ रिपोर्ट्स पाहण्यापुरतेच शिक्षण मिळेल आणि क्लिनिकल अनुभव मिळणार नाही.

एनएमसीच्या नियमानुसार, प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात किमान दोन MRI आणि दोन CT स्कॅन मशीन आवश्यक असतात. अशा परिस्थितीत मशीनचे सरकारी नियंत्रण कमी करून ते PPP मॉडेलवर देणे म्हणजे नियमांना विरोध ठरणार आहे. तसेच काही तज्ज्ञांच्या मते, PPP मॉडेलमध्ये अनेकदा जुन्या मशीनचा वापर केला जातो आणि टेलिमेडिसीनद्वारे अहवाल बनत असल्याने अचूकतेचा अभाव राहू शकतो.

रुग्णालयातील डॉक्टरांचेही म्हणणे आहे की, सरकारी वैद्यकीय महाविद्यालये केवळ उपचार केंद्र नाहीत, तर भावी डॉक्टरांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारीही निभावतात. जर MRI सारख्या महत्त्वाच्या तपासण्या खासगी ताब्यात गेल्या, तर विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणावर मोठा परिणाम होईल. रुग्णांचाही त्रास वाढेल, कारण खासगी ठेकेदारांच्या ताब्यात तपासणीचे दर वाढण्याची शक्यता असते.

या संपूर्ण प्रकरणामुळे जेजे रुग्णालयातील व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे वाढता रुग्णभार, दुसरीकडे बिघडलेली मशीन आणि तिसरीकडे PPP मॉडेलवरील वाद—या सर्वांचा परिणाम रुग्णांवरच होत आहे. सरकारने तातडीने नवीन MRI मशीन बसवण्याचा निर्णय न घेतल्यास पुढील काही महिन्यांत परिस्थिती आणखी गंभीर होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *