टाटा ग्रुपचा टाटा इन्व्हेस्टमेंट स्टॉक 10 भागांमध्ये विभागला जाणार; गुंतवणूकदारांना मोठा फायदा
टाटा ग्रुपचा ‘हा’ स्टॉक १० भागांमध्ये विभागला जाईल – गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्सचा स्टॉक स्प्लिट निर्णय; 1 शेअरचे 10 भाग. गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी.
सायली मेमाणे
पुणे ५ ऑगस्ट २०२५ : टाटा ग्रुपमधील एक महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर्सचे विभाजन (Stock Split) करण्यास आज अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे बाजारात खळबळ उडाली असून, गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने जाहीर केल्यानुसार, विद्यमान शेअर 1:10 च्या प्रमाणात विभागले जाणार आहेत. म्हणजेच, एका शेअरचे 10 भाग केले जाणार आहेत. यामुळे कंपनीचा प्रत्येक शेअर अधिक स्वस्त होणार असून, लहान गुंतवणूकदारांनाही यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.
कंपनीच्या या निर्णयाची घोषणा होताच, शेअर्समध्ये खरेदीचा जोरदार ट्रेंड दिसून आला. आज टाटा इन्व्हेस्टमेंटचे शेअर्स बीएसईवर ₹6982.30 दराने व्यवहार करत होते आणि त्यात 3.01 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. दिवसाच्या सत्रात या शेअर्सनी ₹7156.55 ची कमाल पातळी गाठत 5.58 टक्क्यांची वाढही अनुभवली.
शेअर स्प्लिटचा मुख्य उद्देश म्हणजे शेअर्स अधिक किफायतशीर करून गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ करणे. यामुळे लिक्विडिटी वाढते आणि बाजारातील सक्रियता सुधारते. टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनी ही लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी ओळखली जाते आणि या निर्णयामुळे भविष्यातील गुंतवणूक मूल्य वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी कधी होईल, याची अधिकृत माहिती लवकरच शेअर बाजाराला दिली जाणार आहे.