“दादाला ‘I Love You’ सांग…”; अजित पवारांच्या चाहत्याची पार्थ पवारांना भावनिक साद, व्हिडिओ व्हायरल
“दादाला ‘I Love You’ सांग…”; अजित पवारांच्या चाहत्याची पार्थ पवारांना भावनिक साद, व्हिडिओ व्हायरल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक भावूक क्षण समोर आला आहे. चाहत्याने पार्थ पवारांना दिलेली साद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुणे २८ जानेवारी २०२६ : महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर आज 29 जानेवारी रोजी त्यांच्या कर्मभूमीत, बारामतीमध्ये त्यांना अखेरचा निरोप दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीमधून एक अत्यंत भावूक आणि हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अजित पवार यांचे पार्थिव बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंतिम दर्शनासाठी हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी गर्दी केली होती. या दरम्यानचा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत नकळत अश्रू आणत आहे. या व्हिडिओमध्ये एक कार्यकर्ता अक्षरशः धाय मोकलून रडताना दिसतो आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना भावनिक साद घालताना ऐकू येतो.
रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पार्थ पवार व्यवस्थेची पाहणी करत असताना, त्या कार्यकर्त्याने मोठ्या आवाजात रडत म्हटले, “दादाला ‘I Love You’ सांग, पार्थ दादा… दादाला ‘I Love You’ सांग.” या शब्दांमध्ये त्या कार्यकर्त्याचं आपल्या नेत्यावर असलेलं निस्सीम प्रेम, आपुलकी आणि अपार दुःख स्पष्टपणे जाणवतं. अचानक आलेल्या या भावनिक क्षणामुळे उपस्थित वातावरण अधिकच गहिवरून गेलं.
या सादेवर पार्थ पवार काही क्षण सुन्न झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी हात उंचावून त्या कार्यकर्त्याला शांतपणे प्रतिसाद दिला. त्यांच्या या कृतीत शब्दांशिवायच भावना व्यक्त होत होत्या. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयाचे गेट बंद करण्यात आले. मात्र, तो काही सेकंदांचा क्षण अनेकांच्या मनात कायमचा कोरला गेला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, विविध स्तरांतून भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी “अजितदादांवर जनतेचे किती प्रेम होते, याचा हा जिवंत पुरावा आहे,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी हा क्षण पाहून डोळे पाणावल्याचे सांगितले, तर अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याशी असलेलं आपलं भावनिक नातं आठवत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अजित पवार हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर लाखो कार्यकर्त्यांसाठी ते मार्गदर्शक, आधार आणि आपला माणूस होते. त्यांच्या निधनानंतर उमटणाऱ्या अशा भावनिक प्रतिक्रिया हेच दर्शवतात की त्यांनी सामान्य जनतेच्या मनात किती खोलवर स्थान निर्माण केलं होतं. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र आज आपल्या लाडक्या दादाला अश्रूंनी निरोप देत असून, हा भावूक क्षण त्यांच्या लोकप्रियतेची आणि लोकांशी असलेल्या नात्याची साक्ष देणारा ठरत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information