दारू पिऊन एसटी चालवणाऱ्या चालकांवर थेट निलंबन; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे कडक निर्देश
दारू पिऊन एसटी चालवणाऱ्या चालकांवर थेट निलंबन; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे कडक निर्देश
कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटी चालक व कर्मचाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
पुणे 2५ जानेवारी २०२६ : ST Bus News : मुंबई – कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटी बस चालक आणि इतर कर्मचाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार असून, अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. दारू पिऊन एसटी बस चालवणे म्हणजे थेट प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे असल्याचे सांगत, यापुढे कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालक व वाहकांच्या विश्रांतीगृहांची तपासणी केली. या पाहणीदरम्यान विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. तसेच काही कर्मचाऱ्यांकडून मद्यपान केल्याची दुर्गंधी येत असल्याचेही निदर्शनास आले. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत मंत्री सरनाईक यांनी तेथे उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि संताप व्यक्त केला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, परगावी कर्तव्य बजावणाऱ्या एसटी चालक व वाहकांसाठी विश्रांतीगृहांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र, या सुविधांचा गैरवापर करून मद्यपानासारखी निंदनीय कृत्ये होत असतील, तर ते केवळ शिस्तभंग नाही तर प्रवाशांच्या सुरक्षिततेवर थेट घाला आहे. मद्यपान करून कर्तव्यावर जाणारा कर्मचारी अपघाताला निमंत्रण देतोच, शिवाय एसटीच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर चौकशीअंती केवळ निलंबन नव्हे तर सेवेतून बडतर्फ करण्याचीही कारवाई करण्यात यावी, असा स्पष्ट इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला. यासोबतच, अशा प्रकारांना वेळेत आळा न घालणारे अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले. एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या दुर्लक्षामुळेच असे बेशिस्त वर्तन वाढत असल्याचा आरोप करत, संबंधित सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यापुढे कर्तव्यावर जाणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची, विशेषतः चालकांची, ब्रेथ ॲनालायझरद्वारे मद्यपान चाचणी अनिवार्य करण्याचे आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. या चाचणीत दोष आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात येईल. तसेच परळ बसस्थानकावर आढळून आलेल्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र विभागीय चौकशी समिती नेमण्यात येणार असून, समितीच्या अहवालाच्या आधारे दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे.
या दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील स्वच्छता, प्रसाधनगृहांची स्थिती तसेच बसेसच्या नियोजनाचीही पाहणी केली. प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सुखसुविधांबाबत अधिक दक्ष राहण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. एसटी ही सामान्य प्रवाशांच्या जीवनवाहिनी असून, तिच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information