दीपक मानकर गुन्हा: बनावट दस्तऐवज सादर केल्याप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई
दीपक मानकर गुन्हा
पुणे पोलिसांनी दीपक मानकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बनावट दस्तऐवज सादर केल्याच्या आरोपावर गुन्हा दाखल केला. तपास सुरू असून संबंधित आरोपींविरोधात कडक कारवाई होण्याची शक्यता.
सायली मेमाणे,
३० मे २०२५ : पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात बनावट कागदपत्रे तयार करून सादर केल्याचा गुन्हा दोन आठवडे पूर्वी नोंदवण्यात आला होता. यामध्ये आता त्यांचा मुलगा करण मानकर आणि व्याही सुखेन शहा यांच्याविरुद्धही स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
तपासात समोर आले आहे की, शांतनू सॅम्यूअल कुकडे नावाच्या व्यक्तीवर विदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या नावाखाली सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा आधीच नोंदवलेला आहे. त्याच्यावर तब्बल पाच गुन्हे नोंदले गेले असून, त्याच्या बँक खात्यातून आर्थिक व्यवहार तब्बल १०० कोटी रुपयांपर्यंतचे झाल्याचे आढळले आहे. त्याच बँक खात्यांमधून मानकर कुटुंबियांच्या खात्यांमध्ये पावणेदोन कोटी रुपये जमा झाले आहेत, तर करण मानकरचा सासरा सुखेन शहा यांच्या खात्यात सहा कोटी ५२ लाख रुपये वर्गल्याचे तपासात उघड झाले आहे.
दीपक मानकर यांनी आर्थिक व्यवहारांसाठी पोलिसांना सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचा पोलिस तपासात निष्कर्ष आला. त्यानंतर त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
करण मानकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, ते डोणजे येथे २०२४ मध्ये दुग्ध व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत होते. या व्यवसायासाठी शंतनू कुकडे यांनी ५ कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा करार केला होता, ज्यासाठी एक करारनामा तयार करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात हा करारनामा बनावट असल्याचे आढळले आहे.
त्याचप्रमाणे, करण मानकरच्या सासऱ्याने सांगितले की, त्यांचा मुलगा सिद्धांत मुळशी येथे १० एकर जमीन घेऊन रिसॉर्ट तयार करत आहे. या प्रकल्पासाठी शंतनू कुकडे यांनी ५ कोटी २२ लाख रुपये तर रौनक जैन यांनी १ कोटी ३० लाख रुपये गुंतवले असल्याचा करारनामा त्यांनी सादर केला होता, पण तोही बनावट कागदपत्र असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणावर स्वतः लक्ष ठेवले आहे आणि तपास सुरू आहे.