नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी; ३ डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू

0
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी; ३ डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी; ३ डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू

नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत आदेश जारी केले आहेत. मिरवणुका, ध्वनीक्षेपक वापर, प्रचार वाहनं आणि बॅनर्सवर निर्बंध लागू; आदेश ३ डिसेंबरपर्यंत अंमलात.

सायली मेमाणे

१२ नोव्हेंबर २०२५ : पुणे – नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका २०२५ शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये आदेश जारी केले आहेत. हे आदेश ३ डिसेंबर २०२५ पर्यंत अंमलात राहणार असून, निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ, अनुशासनभंग किंवा अराजकता होऊ नये यासाठी हे निर्बंध लावण्यात आले आहेत.

या आदेशांनुसार, राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि हितचिंतक यांना काही नियमांचे पालन बंधनकारक केले आहे. मुद्रणालय, प्रकाशक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि प्रचार मोहिमा राबवणाऱ्यांनाही या आदेशाचा प्रभाव राहणार आहे. नमुना मतपत्रिकेच्या छपाईदरम्यान इतर उमेदवारांची नावे किंवा त्यांची अधिकृत चिन्हे वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ठरवलेल्या आकार आणि रंगातच नमुना मतपत्रिका छापण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये, तालुका दंडाधिकारी कार्यालये, तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारची सभा, मोर्चा, उपोषण, घोषणाबाजी, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे यास कडक बंदी घालण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रचार किंवा जनतेला आवाहन करणारे उपक्रम सरकारी परिसरात राबवता येणार नाहीत.

सार्वजनिक ठिकाणी निवडणूक प्रचाराचे साहित्य लावण्यावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक इमारती, रस्ते, चौक, आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊट्स, होर्डिंग्ज किंवा कमानी लावण्यास परवानगी नाही. यामुळे अपघाताचा धोका आणि वाहतूक कोंडी टाळण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. उमेदवार किंवा पक्षाने प्रचारासाठी १० पेक्षा अधिक वाहनांचा ताफा वापरू नये, असे आदेशात नमूद आहे. वाहनांवर पक्षाचे झेंडे आणि फलक लावताना ठराविक मर्यादा पाळणे आवश्यक आहे. वाहनाच्या डाव्या बाजूस झेंडा लावता येईल, परंतु तो विंडस्क्रीनच्या पुढे किंवा वाहनाच्या टपापासून दोन फूटांपेक्षा उंच नसावा. तसेच, फलक केवळ वाहनाच्या डाव्या आणि उजव्या बाजूसच लावण्यात यावा. या झेंड्यांसाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किंवा उमेदवारांकडून अधिकृत परवानगी घेणे अनिवार्य आहे.

ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत देखील प्रशासनाने कठोर नियम लागू केले आहेत. कोणतीही व्यक्ती किंवा पक्ष पोलीस परवानगीशिवाय ध्वनीक्षेपक वापरू शकणार नाही. सकाळी सहा वाजण्यापूर्वी आणि रात्री दहा वाजल्यानंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच, फिरत्या वाहनावरून ध्वनीक्षेपक वापरण्यास बंदी असून, प्रचार केवळ ठराविक ठिकाणी थांबूनच करता येणार आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ नुसार कारवाई करण्यात येईल. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे की, या निर्बंधांचा उद्देश निवडणुकीचा कालावधी शांत, सुरक्षित आणि पारदर्शक ठेवणे आहे. नागरिकांनी, उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

या आदेशामुळे निवडणूक प्रचारातील अराजकता टाळली जाईल आणि मतदारांना निर्भयपणे मतदानाचा अधिकार बजावता येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *