नवव्या मजल्यावरून मांजर फेकली; मुंबईत शू रॅकवर बसल्याचा राग प्राणघातकी ठरला

1
नवव्या मजल्यावरून मांजर फेकली

नवव्या मजल्यावरून मांजर फेकली

मुंबईतील मालाड येथे नवव्या मजल्यावरून पाळीव मांजर फेकल्याची घटना सीसीटीव्हीत कैद; आरोपी शेजाऱ्याविरोधात प्राण्यांच्या छळविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.

सायली मेमाणे

मुंबई १२ जून २०२५ : मुंबईच्या मालाड परिसरात घडलेली एक असंवेदनशील घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. नवव्या मजल्यावरून मांजर फेकली गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप एका स्थानिक रहिवाशावर करण्यात आला आहे. या घटनेने प्राणीमित्र आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण केला आहे.

ही धक्कादायक घटना मालाड पश्चिमेतील ग्रो मोर वनेक्स या निवासी इमारतीत घडली. या इमारतीत राहणाऱ्या गुरनाज समशी नावाच्या कपड्यांच्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या पाळीव मांजरीवर झालेल्या अत्याचाराविरोधात मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी संध्याकाळी ही घटना समोर आली.

गुरनाज समशी यांच्या ‘कालू’ नावाच्या काळी-पांढऱ्या मांजरीला एप्रिल २०२४ पासून त्यांच्या कुटुंबाने पाळले होते. त्या दिवशी कालू फिरायला म्हणून घराबाहेर गेली होती. काही वेळातच, इमारतीखाली खेळणाऱ्या मुलांनी एक मांजर खाली पडल्याचे पाहिले. हतबल अवस्थेत तडफडणाऱ्या मांजरीचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर समशी कुटुंबाने सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये फ्लॅट क्रमांक ९०१ मध्ये राहणाऱ्या कासम सय्यद नावाच्या व्यक्तीने घराबाहेरील शू रॅकवर बसलेल्या मांजरीला उचलून खिडकीतून खाली फेकल्याचे स्पष्ट दिसून आले. हे फुटेज तात्काळ मोबाईलमध्ये घेत, समशी यांनी पोलिस ठाण्यात सादर केले आणि कासम सय्यदविरोधात प्रकरण नोंदवले.

पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधानासह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा (Prevention of Cruelty to Animals Act) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, तपासासाठी परिसरातील अधिक सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येत असून, शेजाऱ्यांच्या साक्षी घेण्याचे कामही सुरू आहे.

या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सोशल मीडियावर संबंधित घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

1 thought on “नवव्या मजल्यावरून मांजर फेकली; मुंबईत शू रॅकवर बसल्याचा राग प्राणघातकी ठरला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed