नवी मुंबईत 83 कोटींच्या ऑनलाइन फसवणुकीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार अटकेत, 12 जण पकडले

0
नवी मुंबईत 83 कोटींच्या ऑनलाइन फसवणुकीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार अटकेत, 12 जण पकडले

नवी मुंबईत 83 कोटींच्या ऑनलाइन फसवणुकीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार अटकेत, 12 जण पकडले


नवी मुंबई गुन्हे शाखेने ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली 83.97 कोटींची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला. मुख्य सूत्रधार बेलापूरहून अटक; एकूण 12 आरोपी जप्तीसह ताब्यात.

६ ऑक्टोबर २०२५ : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने देशभरात ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक करणाऱ्या एक सराईत टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 83.97 कोटी रुपयांच्या ऑनलाइन फ्रॉडचा मोठा गुन्हा उघड केला आहे. या रॅकेटद्वारे आरोपींनी महाराष्ट्रासह विविध राज्यांतील शेकडो नागरिकांना “खेळून कमवा”, “नशीब आजमवा”, “पैसे दुप्पट मिळवा” अशा आर्कषक आमिषांमध्ये ओढून त्यांच्या खात्यातून लाखो रुपये लाटले. या प्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातील 18.05 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या तपासानुसार, ही टोळी सोशल मीडिया, WhatsApp आणि Telegram गटांचा वापर करून फसवणुकीचे जाळे देशभर पसरवत होती. आरोपी लोकांना ऑनलाईन गेमिंग अॅप डाउनलोड करण्यास सांगत आणि गुंतवणुकीचे आश्वासन देत. नागरिकांनी पैसे जमा केल्यानंतर अॅप अचानक बंद होई, खेळ थांबे आणि अकाउंट ब्लॉक होत असे. यानंतर सर्व रक्कम आरोपी विविध बोगस खात्यांमार्फत काढून घेत असत. तपासात या टोळीने 886 वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार इम्रान उस्मानी मिनहाज शेख (वय 32) याला सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली. इम्रान हा लोकांकडून पासबुक, एटीएम कार्ड, मोबाइल सिमकार्ड गोळा करून बोगस खाती उघडण्याचे काम करीत असे. ही माहिती तो साथीदारांना देत असे आणि ते या खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार करून पैसे परदेशी खात्यांमध्ये ट्रान्सफर करत असल्याचे समोर आले आहे.

इम्रानच्या अटकेनंतर नवी मुंबई पोलिसांनी पुणावळे (पिंपरी-चिंचवड) आणि डोंबिवली येथील विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत आणखी सहा जण अटकेत आले, तसेच त्यांच्या मोबाईल डिव्हाइस आणि लॅपटॉपमधून सायबर व्यवहारांचे अनेक पुरावे जप्त करण्यात आले. पुढील तपासात या रॅकेटचे आणखी पाच साथीदार ओळख पटताच त्यांनाही अटक करण्यात आली.

आरोपींकडून एकूण 52 मोबाईल फोन, 7 लॅपटॉप, 99 डेबिट कार्ड, 64 पासबुक, तसेच टाटा सफारी स्टॉर्म वाहन असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आणि ऑनलाईन गेमिंग प्रतिबंधक अधिनियम 2025 अंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपींनी लाटलेल्या पैशांचे मूळ, व्यवहारांचे मार्ग आणि परदेशातील खात्यांशी असलेल्या संबंधांचा शोध घेतला जात आहे.

नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी लिंक, ऑनलाईन गेमिंग अॅप किंवा WhatsApp गुंतवणूक गटांपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा प्लॅटफॉर्मवरील “सहज कमवा” प्रकारातील जाहिराती बहुसंख्य वेळा फसवणुकीच्या असतात. फसवणूक झाल्यास नागरिकांनी त्वरित सायबर हेल्पलाइन १९३० किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *