नागपूर ओरियन स्पा सेक्स रॅकेट उघडकीस; नेपाळ, सिक्कीमच्या तरुणींचा वापर, दलाल अटकेत

0
नागपूर ओरियन स्पा सेक्स रॅकेट उघडकीस; नेपाळ, सिक्कीमच्या तरुणींचा वापर,

नागपूर ओरियन स्पा सेक्स रॅकेट उघडकीस; नेपाळ, सिक्कीमच्या तरुणींचा वापर,

नागपूरच्या त्रिमूर्तीनगरमधील ओरियन स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकून नेपाळ व सिक्कीमच्या दोन तरुणींची सुटका केली. दलाल अटकेत, मुख्य सूत्रधार पिंकी थापा फरार.

सायली मेमाणे

नागपूर २८ जून २०२५ : नागपूर शहरातील त्रिमूर्तीनगर परिसरात मुस्कान वर्षा अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या ओरियन स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेला मिळताच त्यांनी धाड टाकली. या कारवाईत दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून दलाल तौसिफ करीम शेखला अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार पिंकी थापा ही सध्या फरार असून पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या तरुणींपैकी एक सिक्कीमची असून दुसरी नेपाळमधील आहे. दोघींच्याही ताब्यातून दीड लाखांहून अधिक किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांनी पंटरला ग्राहक म्हणून ओरियन स्पा सेंटरमध्ये पाठवले. तेथे पंटरला दोन तरुणी दाखवण्यात आल्या आणि सौदा ठरल्यावर त्याने सिग्नल दिला. दबा धरून असलेल्या पोलिस पथकाने तत्काळ छापा टाकून तौसिफ शेखला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने कबूल केले की तो पिंकी थापा या मुख्य सूत्रधारासाठी काम करतो. पिंकी ही मूळची नेपाळची असून, ती काही वर्षांपूर्वी नागपुरात आली होती आणि तिनेच हे स्पा सेंटर सुरू केले होते.

पोलिसांनी तौसिफकडून दोन मोबाईल फोन, रोख ४,५०० रुपये, डीव्हीआर, इतर साहित्य असा एकूण ३७,५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध पीटा अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास प्रतापनगर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

पीडितांपैकी सिक्कीमची युवती २३ वर्षांची असून, नेपाळची युवती २९ वर्षांची आहे. नेपाळमधील युवती विवाहित असून, तिला आठ वर्षांचा मुलगा आहे. तिचा पती दिल्लीमध्ये काम करतो. या दोघींची तीन महिन्यांपूर्वी नागपुरात खरेदी झाली होती आणि त्यांना ओरियन स्पामध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणामुळे त्रिमूर्तीनगरमधील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून, स्थानिक पातळीवर अशा व्यवसायांचे उगमस्थान म्हणून स्पा सेंटरकडे पाहिले जात आहे.

पिंकी थापा हिने काही वर्षांपूर्वी नागपुरात स्थायिक होऊन हा व्यवसाय सुरू केला होता. तिनेच तौसिफ शेखला हे सेंटर सांभाळण्यासाठी कामावर घेतले होते. पोलीस आता पिंकीचा माग काढत असून, तिच्या नेटवर्कबाबत तपास सुरू आहे. स्पा सेंटरच्या आडून नागपुरात चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेचे हे मोठे यश मानले जात आहे. पोलिसांनी नागपूरमधील इतर स्पा सेंटरची तपासणीही सुरू केली असून, आणखी अशा रॅकेट्सचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed