पंकजा मुंडेंचं परळीला गुडबाय? लोहा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का, राजकीय चर्चांना उधाण
पंकजा मुंडेंचं परळीला गुडबाय? लोहा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का, राजकीय चर्चांना उधाण
पंकजा मुंडेंच्या परळीबाबतच्या विधानानंतर मोठी राजकीय चर्चा; बीड सोडून नांदेडच्या लोहा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली.
पुणे 0६ डिसेंबर २०२६ : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. परळी मतदारसंघाबाबत बोलताना त्यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे त्या आता बीड जिल्हा सोडून नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नांदेडमधील माळाकोळी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात “मी परळी धनुभाऊला देऊन टाकली आहे, आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या” असे विधान करताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारशामुळे परळी हा पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला मानला जात होता. अनेक वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि परळीवर धनंजय मुंडे यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यानंतर झालेल्या नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही धनंजय मुंडे यांनी आपली पकड अधिक मजबूत केली. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना परळीत राजकीय आव्हान वाढत गेले असल्याचे चित्र आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना अपेक्षित आघाडी मिळाली नाही. यामुळेच त्यांनी आता नव्या राजकीय पर्यायांचा विचार सुरू केल्याची चर्चा आहे. माळाकोळी हा परिसर लोहा विधानसभा मतदारसंघात येतो आणि गोपीनाथ मुंडे यांच्याशी भावनिक नाते असलेला हा भाग पंकजा मुंडे यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
लोहा विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे पाहिली, तर हा मतदारसंघ प्रामुख्याने मराठा बहुल आहे. येथे सुमारे ६० टक्के मराठा, २५ टक्के ओबीसी आणि १२ टक्के मुस्लिम मतदार आहेत. पंकजा मुंडे या ओबीसी समाजातील प्रभावी चेहरा असल्या तरी मराठा आरक्षण आंदोलनानंतर निर्माण झालेली सामाजिक आणि राजकीय स्थिती पाहता, लोहा मतदारसंघातून निवडणूक लढवणे त्यांच्यासाठी राजकीय जोखीम ठरू शकते. तरीही, लोहा परिसरात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
दरम्यान, परळीत बहीण-भावामधील नातेसंबंधांचे चित्रही चर्चेत राहिले आहे. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंकरिता साडी खरेदी केल्याचा प्रसंग आणि त्यानंतर पंकजा मुंडेंनी “धनुभाऊच्या जखमेवर मलम लावले” असे केलेले विधान, यामुळे परळी मतदारसंघ आपण भावासाठी मोकळा करून देत असल्याचे संकेत दिले जात आहेत. मात्र, पंकजा मुंडे जर खरोखरच परळी सोडणार असतील, तर त्यांच्या स्थानिक समर्थकांचे भवितव्य काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
लोहा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी पंकजा मुंडेंच्या संभाव्य उमेदवारीचे स्वागत करत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तीन वेगवेगळ्या पक्षांतून निवडून आलेल्या चिखलीकरांची भूमिका पुढील राजकीय गणितांमध्ये निर्णायक ठरू शकते. पंकजा मुंडेंचे हे विधान भावनिक होते की ती एक ठोस राजकीय रणनीती आहे, याचे स्पष्ट उत्तर आगामी काळातच मिळणार आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information