पिंपरी-चिंचवडमध्ये जीममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू, हार्ट अटॅकमुळे घटना
पिंपरी-चिंचवडमध्ये जीममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू, हार्ट अटॅकमुळे घटना
पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड गावातील जीममध्ये व्यायाम करताना 37 वर्षीय मिलिंद कुलकर्णी यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. डॉक्टर पत्नी असूनही ही दुर्दैवी घटना घडली.
सायली मेमाणे
पुणे १ ऑगस्ट २०२५ : पिंपरी-चिंचवड शहरातून समोर आलेली जीममधील एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनली आहे. ३७ वर्षीय मिलिंद कुलकर्णी या तरुणाचा व्यायाम करत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चिंचवड गावातील एका जीममध्ये दर काही दिवसांनी ते व्यायाम करत असत. आज सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे व्यायामास सुरुवात केली होती. व्यायामानंतर थोड्याच वेळात पाणी प्यायल्यानंतर ते एका बाकावर बसले आणि काही क्षणांतच त्यांना चक्कर आली. लोकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.
मिलिंद कुलकर्णी यांच्या पत्नी या स्वतः वैद्यकीय व्यावसायिक असून, ही घटना आरोग्य क्षेत्रासाठीही अत्यंत धक्कादायक आहे. अशा दुर्दैवी घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मिलिंद यांचं वय केवळ ३७ वर्ष होतं, आणि त्यांना कोणतीही गंभीर प्रकृतीची तक्रार असल्याचं आधी समोर आलं नव्हतं. या घटनेने व्यायाम करताना होणाऱ्या हृदयविकाराच्या घटनांबाबत अधिक जागरूकतेची गरज अधोरेखित केली आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी संपूर्ण आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. अचानक, तीव्र किंवा आपल्या क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम केल्याने हृदयावर ताण येतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः ३० वर्षांच्या पुढील वयोगटातील लोकांनी हृदयाची नियमित तपासणी करून, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करावा, असा इशारा आरोग्य तज्ज्ञ देत आहेत.
या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, फिट राहण्यासाठी जीमला जाणाऱ्या नागरिकांनी आता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. चांगल्या शरीरसंपदेसाठी जीमला जाणे हे योग्य असले, तरीही शरीराच्या क्षमतेनुसार आणि वैद्यकीय मार्गदर्शनानुसार व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. नाहीतर हे व्यायामाचे ठिकाणच जीवघेणं ठरू शकतं, हे या घटनेवरून अधोरेखित होतं.
या घटनेनंतर संबंधित जीम व्यवस्थापनाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, या प्रकरणाची चौकशी केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जीममध्ये योग्य प्रशिक्षण, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन उपचार यांची उपलब्धता असावी, यावर आता अधिक भर देण्याची वेळ आली आहे.