पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मास्क मॅन’ची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मास्क मॅन’ची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क घालून धारदार चाकूसह फिरणाऱ्या ‘मास्क मॅन’मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
सायली मेमाणे
पुणे २२ ऑगस्ट २०२५ : पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरात सध्या ‘मास्क मॅन’च्या नावाने नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चेहऱ्यावर मास्क आणि हातात धारदार चाकू घेऊन हा अज्ञात व्यक्ती भरदिवसा शहराच्या रस्त्यांवर वावरताना दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, स्थानिक पोलिस प्रशासनालाही आव्हान निर्माण झाले आहे.
शहरात काही दिवसांपासून रात्री व दिवसा ही व्यक्ती विविध भागात दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात चोरी, लुटमार, दरोडे यासारख्या घटना आधीच वाढल्या असताना आता या ‘मास्क मॅन’मुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
याप्रकरणी काही लोकांनी ‘मास्क मॅन’च्या हालचालींचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. नागरिकांनी देखील संशयास्पद हालचाली दिसताच त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता पोलिस किती लवकर ‘मास्क मॅन’ला पकडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.