पुणे एसटी विभागात ११३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती; स्वप्न अखेर पूर्ण
पुणे एसटी विभागात ११३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती; स्वप्न अखेर पूर्ण
पुणे एसटी विभागात ११३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची स्वप्ने पूर्ण झाली आहेत. यामुळे विभागाच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होणार आहे.
सायली मेमाणे
पुणे ३० ऑगस्ट २०२५ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागात अखेर अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची स्वप्ने पूर्ण झाली आहेत. सन २०२४-२५ या वर्षासाठी एकूण ११३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. विभागीय कार्यालयाच्या आकडेवारीनुसार अधिकारी वर्गातील ८ जणांना तर कर्मचारी वर्गातील तब्बल १०५ जणांना पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये विभागीय वाहतूक अधिकारी १, आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) १, सुरक्षा निरीक्षक १, राखण व पहारा निरीक्षक १ आणि सहायक वाहतूक अधिकारी ४ जणांचा समावेश आहे. तर कर्मचारी वर्गात वाहतूक निरीक्षक ६, सहायक वाहतूक निरीक्षक १२, वरिष्ठ लिपिक २१, प्रमुख कारकून ८, कारागिर ‘क’ ३९ आणि सहायक कारागिर १९ जणांना पदोन्नती मिळाली आहे. अशा प्रकारे अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण ११३ जणांना या यादीत स्थान मिळाले आहे.
ही पदोन्नती झाल्याने विभागातील कामकाज अधिक कार्यक्षम होईल, कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ होईल आणि संघटनात्मक ताकद मजबूत होईल. अनेक कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळातील प्रलंबित पदोन्नती मंजूर झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. विभाग नियंञक अरुण सिया यांनी सांगितले की, यंदाच्या पदोन्नती प्रक्रियेमुळे विभागात कार्यसंघटन अधिक प्रभावीपणे राबवता येईल.
तथापि, सध्या अजूनही तांत्रिक कारणांमुळे ४० पदोन्नतीची पदे रखडलेली आहेत. ती समस्या दूर होताच उर्वरित कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्गही मोकळा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे अजूनही प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त पुणे एसटी विभागाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. कोकणातील गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि लाखो कोकणवासीय आपल्या गावी जातात. या पार्श्वभूमीवर पुणे विभागातून यावर्षी तब्बल २३० एसटी बसेस कोकणात सोडण्यात आल्या आहेत. प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांनी एक महिन्यापूर्वीच गटाने आरक्षण केले होते. पुणे जिल्ह्यातून धावणाऱ्या या बससेवेचा हजारो प्रवाशांना फायदा होत आहे.
पदोन्नतीचा निर्णय आणि कोकणासाठी करण्यात आलेल्या सोयी या दोन्ही घडामोडींमुळे पुणे एसटी विभाग चर्चेत आला आहे. एका बाजूला कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमुळे समाधान आणि मनोबल वाढले आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रवाशांना सणासुदीच्या काळात सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळत आहे. यामुळे विभागाची एकंदर प्रतिमा आणि कार्यक्षमता अधिक बळकट होत आहे.