पुणे पर्यटनस्थळांची माहिती आणि बुकिंग आता एका क्लिकवर; जिल्हा प्रशासनाचा डिजिटल पुढाकार
पुण्यातील पर्यटनस्थळांची माहिती आणि बुकिंग आता एका ॲपवर!
पुण्यातील पर्यटनस्थळांची माहिती आणि बुकिंग आता एका ॲपवर! जिल्हा प्रशासनाने नवे ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, पर्यटकांना जलपर्यटन, ऐतिहासिक व निसर्गस्थळांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे
सायली मेमाणे
पुणे ११ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यातील पर्यटनाला आता डिजिटल पंख लाभणार आहेत. ऐतिहासिक, पौराणिक आणि निसर्गसंपन्न स्थळांची माहिती एकत्रित करून एका ॲपवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पुण्यातील पर्यटक आणि देश-विदेशातील प्रवाशांना एका क्लिकवर पर्यटनस्थळांची माहिती आणि बुकिंगसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
पुणे जिल्ह्यात सिंहगड, पुरंदर, रायरेश्वरसारखी गडकोटं, भीमाशंकरसारखी धार्मिक ठिकाणं आणि मुळशी, टेमघर, पानशेतसारखी जलपर्यटन स्थळं मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, अनेक पर्यटनस्थळे अशी आहेत ज्यांची माहिती पुरेशी उपलब्ध नसते. यामुळे पर्यटकांची संख्या काही निवडक ठिकाणीच मर्यादित राहते. परिणामी, पर्यटकांची गर्दी एका ठिकाणीच केंद्रित होते आणि काही वेळा कुंडमळा दुर्घटनेसारखे प्रसंगही घडतात. अशा परिस्थितीत पर्यटनस्थळांचे प्रमाणित आणि सुरक्षित डिजिटल माहितीकरण अत्यंत गरजेचे होते.
जिल्हा प्रशासनाने आता याच गरज ओळखून एक ‘पुणे पर्यटन ॲप’ (Pune tourism app) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या ॲपद्वारे पर्यटकांना पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख आणि लपलेली पर्यटनस्थळे शोधता येतील. त्याचबरोबर ॲपवरून बुकिंगसुद्धा करता येणार असल्याने ही सेवा पर्यटकांसाठी खूपच सोयीची ठरणार आहे. या निर्णयामुळे पुण्यातील पर्यटन व्यवसायाला मोठा चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही हातभार लागणार आहे.
‘डिजिटल इंडिया’ मोहिमेच्या अनुषंगाने हे ॲप पर्यटन क्षेत्रासाठी एक अभिनव पाऊल ठरणार आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी, ज्यांना स्थानिक स्थळांची माहिती मिळवणे अवघड जाते, त्यांना या माध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटनाचा ब्रँडिंग आणि ग्लोबल पोहोच वाढेल.
या ॲपमध्ये पर्यटकांना स्थळांची माहिती, वेळा, इतिहास, वाहतूक मार्ग, आसपासची रहदारी व हॉटेल्सची माहिती यांचाही समावेश असणार आहे. शिवाय, कोणते पर्यटनस्थळ सध्या गर्दीमुळे बंद आहे किंवा तिकिट बुकिंगची स्थिती काय आहे, याचीही माहिती रिअल-टाइममध्ये मिळू शकणार आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ॲपच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन एक ‘पर्यटन विकास आराखडा’ तयार करत आहे. या आराखड्यातून पर्यटन स्थळांची यादी, त्यांच्या गरजा, पर्यटन दृष्टीने विकास करण्यायोग्य भाग यावर लक्ष दिले जाणार आहे.
अशा ॲपद्वारे पर्यटकांची सुरक्षितता, सुविधा आणि अनुभव उत्तम होणार असून पर्यटनाचा दर्जा सुधारेल. हे ॲप लवकरच लाँच होण्याची शक्यता असून त्यासाठी सर्व माहितीचे संकलन आणि तांत्रिक पायाभूत काम अंतिम टप्प्यात आहे. पुणे जिल्ह्याच्या पर्यटनाच्या पुढील प्रगतीसाठी हा एक निर्णायक टप्पा ठरेल.