पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ हवेच! सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांना मागणी
पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ हवेच! सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांना मागणी
सुप्रिया सुळे यांनी पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याची मागणी करत देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मुंबईच्या अंतरामुळे न्यायासाठीचा त्रास दूर करण्याची गरज मांडली आहे.
सायली मेमाणे
पुणे ५ ऑगस्ट २०२५ : खासदार सुप्रिया सुळेंनी पुणे जिल्ह्यासाठी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी पुणे जिल्ह्यातील नागरिकांना सहसा ३०० ते ३५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, हे नमूद केले आहे. विशेषतः जिल्ह्यातील इंदापूरसारख्या तालुक्यातून मुंबईपर्यंतचा प्रवास वेळखाऊ, आर्थिकदृष्ट्या खर्चिक आणि सामान्य जनतेसाठी त्रासदायक ठरतो. न्याय मिळवण्यासाठी दूरवर प्रवास करावा लागणे म्हणजे लोकशाहीतील मूलभूत हक्कांवर मर्यादा आल्यासारखी स्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
सुप्रिया सुळेंच्या म्हणण्यानुसार, कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ असल्यामुळे तिथल्या जनतेला न्यायप्रक्रियेमध्ये दिलासा मिळतो. तसाच न्याय पुणे जिल्ह्याच्या नागरिकांनाही मिळावा, अशी मागणी त्यांनी स्पष्टपणे मांडली आहे. पुणे हे महाराष्ट्रातील प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक आणि प्रशासकीय केंद्र असून, येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे इथे खंडपीठाची स्थापना ही केवळ न्यायिक गरजच नाही तर प्रशासनिक दृष्टीने सुद्धा योग्य पाऊल ठरेल.
पुणे जिल्ह्यातील लोकसंख्या मोठी असून, न्यायालयीन खटल्यांची संख्याही लक्षणीय आहे. मुंबईच्या न्यायालयावर असलेला प्रचंड भार कमी करण्यासाठी सुद्धा पुण्यात खंडपीठ स्थापनेचा विचार होणे गरजेचे आहे. सुप्रिया सुळे यांच्या या पत्रामुळे पुणे खंडपीठाची मागणी पुन्हा एकदा चर्चेत आली असून, अनेक सामाजिक संस्था, वकील संघटनांनी यापूर्वीही ही मागणी सातत्याने केली आहे.
राज्यातील न्याय व्यवस्था लोकाभिमुख आणि सुलभ व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा सुळेंनी व्यक्त केली आहे. या मागणीला आता जनतेचा प्रतिसाद मिळत असून, लवकरच याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.