पुण्यात २६ किलो गांजासह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; २६ किलो गांजासह आरोपी जेरबंद
पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रज रोडवर कारवाई करत २६ किलो गांजासह एक रेकॉर्डवरील आरोपी अटक केला. एकूण २१ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त. सविस्तर वाचा.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे ६ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा यांनी मोठी यशस्वी कारवाई करत रेकॉर्डवरील आरोपीस २६ किलो ८० ग्रॅम गांजासह अटक केली आहे. या कारवाईत एकूण २१,१६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हा प्रकार मंतरवाडी, कात्रज रोड येथे घडला.
दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस अधिकारी आणि अमंलदार पुणे आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी मेट्रो मोटर्स, मंतरवाडी, कात्रज रोड परिसरात त्यांना काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीत एक व्यक्ती संशयास्पदरीत्या बसलेला आढळून आला.
तपास केला असता संबंधित व्यक्तीचे नाव अनिल उर्फ अण्णा सुभाष राख (वय ४६) असे असून, तो प्रगतीनगर, हडपसर येथील रहिवासी आहे. सदर आरोपी पूर्वीही गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची नोंद आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी गाडीची झडती घेतली असता गाडीच्या मागील सीटवर पिवळसर-हिरव्या नायलॉनच्या पोत्यामध्ये भरलेले १५ पॅकेट्स आढळून आले, ज्यामध्ये एकूण २६ किलो ८० ग्रॅम गांजा होता. या गांजाची अंदाजित बाजारभाव किंमत ५,३६,०००/- रुपये इतकी आहे.
याशिवाय ज्या वाहनात गांजा साठवलेला होता ती महिंद्रा थार फोर व्हिलर गाडी आणि मोबाईल फोन यासह एकूण २१,१६,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपीविरोधात फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे
गु.र.नं २४६/२०२५,
एन.डी.पी.एस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, आणि अपर आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
ही कारवाई पो.नि. प्रशांत अन्नछत्रे, सहा. पो.नि. अनिल सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली दयानंद तेलंगे, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, विशाल दळवी, सचिन माळवे, संदिप शिर्के आदी पथकाने केली. यामध्ये फुरसुंगी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचाही सहभाग होता.