प्रभाग ९ मध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध बंडखोर’ लढत रंगात; चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी खरी ठरणार का?
प्रभाग
पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग ९ ही सर्वाधिक हाय-व्होल्टेज लढत ठरली असून, चंद्रकांत पाटलांच्या भविष्यवाणीने लहू बालवडकरांच्या प्रचाराला मोठी धार मिळाली आहे.
पुणे| दि. १० जानेवारी :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रभाग क्रमांक ९ (सूस-बाणेर-बालेवाडी-पाषाण) ही लढत शहरातील सर्वाधिक चर्चेची आणि हाय-व्होल्टेज ठरत आहे. भाजपचे उमेदवार लहू बालवडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अमोल बालवडकर यांच्यातील थेट मुकाबला अधिक तीव्र होत असतानाच, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याने या लढतीला नवे वळण दिले आहे.

लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ६ जानेवारी रोजी आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केला. “प्रभाग ९ मधून लहू बालवडकर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी नगरसेवक म्हणून निवडून येतील. डायरीत लिहून ठेवा, ही भविष्यवाणी खरी ठरेल,” असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, प्रभागातील आरएसएस केडर सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
भाजपकडून घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद, पदयात्रा, सोसायटी भेटी आणि रस्ते, पाणीपुरवठा व वाहतूक या विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित प्रचार सुरू आहे. त्यामुळे लहू बालवडकर यांच्या प्रचाराला गती मिळाल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे, अमोल बालवडकर यांचा कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. भाजप समर्थकांकडून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचारात अडथळे निर्माण होत आहेत.
भाजपकडून लहू बालवडकर, रोहिणी चिमटे, गणेश कळमकर आणि मयुरी कोकाटे यांचे पॅनेल तर राष्ट्रवादीकडून अमोल बालवडकर, गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे आणि पार्वती निम्हाण यांचे पॅनेल मैदानात आहे. आयटी हब आणि निवासी मतदारसंख्या मोठी असलेल्या या प्रभागात विकास आणि निष्ठेला महत्त्व दिले जात आहे.
१५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असून, ही लढत आता स्पष्टपणे ‘निष्ठावंत विरुद्ध बंडखोर’ अशी रंगत घेत आहे.
Follow us On Our Social media Handles :
Instagram
Youtube
Facebook
Twitter
Also Read- Pune