बनावट सह्यांवर ३० कोटींचं कर्ज नूतनीकरण; माजी आमदार संजय जगताप यांच्याच पत्नीची मोठी फसवणूक

2
बनावट सह्यांवर ३० कोटींचं कर्ज नूतनीकरण

बनावट सह्यांवर ३० कोटींचं कर्ज नूतनीकरण

बनावट सह्या करून ३० कोटींच्या कर्जाचे नूतनीकरण; माजी आमदार संजय जगताप यांच्या पत्नीच्या नावावर मोठा घोटाळा; बंडगार्डन पोलीस तपासात व्यस्त.

सायली मेमाणे

पुणे: २३ जून २०२५ : पुण्यातील बंडगार्डन परिसरात एक धक्कादायक आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या पत्नी राजवर्धिनी जगताप यांनी एका फायनान्स कंपनीविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह कंपनी संचालकांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरून तब्बल ३० कोटी रुपयांचे कर्ज नूतनीकरण करण्यात आले आहे.

राजवर्धिनी जगताप या लष्कर परिसरातील मोलेदिना रस्त्यावर असलेल्या एका मोटार वाहन विक्री-दुरुस्ती कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी आणि त्यांच्या कंपनीने व्यावसायिक उद्दिष्टांसाठी रिलायन्स कमर्शियल फायनान्स कंपनीकडून २०१८ पूर्वी २९ कोटी रुपये कर्ज घेतले होते. यासाठी त्यांनी संजय जगताप यांचा सासवड येथील बंगला आणि कंपनी संचालकांच्या मालकीची इतर संपत्ती तारण ठेवली होती. नऊ कर्ज प्रकरणांपैकी सात प्रकरणांची परतफेड झाल्याचे प्रमाणपत्रही मिळाले होते.

मात्र, अलीकडे या फायनान्स कंपनीच्या उत्तराधिकारी असलेल्या ‘ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर’कडून संपत्ती जप्तीची नोटीस आली. यामुळे राजवर्धिनी जगताप यांनी चौकशी केली असता, २०१८ मध्ये कर्ज नूतनीकरण झाल्याची माहिती समोर आली – तीदेखील त्यांच्या माहितीशिवाय. त्यांनी जेव्हा या दस्तऐवजांची स्वतंत्र न्यायवैद्यकीय तपासणी केली, तेव्हा सर्व स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणात मनीष मोरणकर (पिंपळे निलख) आणि शकील नदाफ (मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासात ही साखळी फसवणूक असल्याचे लक्षात आले असून, बँक स्टेटमेंट, कर्ज हस्तांतरणाच्या खात्यांची चौकशी, तसेच कंपनीकडून संबंधित कागदपत्रांची मागणी केली गेली आहे. मात्र कंपनीकडून आवश्यक माहिती दिली न गेल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते करत आहेत. संबंधित फायनान्स कंपनीच्या जबाबदारीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून, मोठ्या आर्थिक संस्थांनी अशा गंभीर प्रकरणात योग्य रेकॉर्ड व्यवस्थापन आणि तपशीलवार पडताळणी करणे अपेक्षित होते.

सध्या पोलीस पुरावे गोळा करत असून, या फसवणुकीत आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. ही घटना केवळ एका व्यावसायिक महिला उद्योजिकेची आर्थिक फसवणूक नसून, संपत्ती, दस्तऐवज आणि संस्थात्मक विश्वास व्यवस्थेवर मोठा आघात करणारी ठरत आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

2 thoughts on “बनावट सह्यांवर ३० कोटींचं कर्ज नूतनीकरण; माजी आमदार संजय जगताप यांच्याच पत्नीची मोठी फसवणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed