बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा संताप; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर इशारा
बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा संताप; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर इशारा
बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोणीकरांनी प्रायश्चित न केल्यास पळता भुई थोडी करू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
सायली मेमाणे
२६ जून २०२५: बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावरुन नवा वाद; काँग्रेसने दिला ‘हा’ गंभीर इशारा राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे आणि यावेळी केंद्रस्थानी आहेत भाजपाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर. त्यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचंड संतापाची लाट उसळली असून काँग्रेसने यावर कडक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, “जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला शिवीगाळ करणे ही विकृतीचा कळस आहे. अशा व्यक्तींनी त्वरित प्रायश्चित करावे, नाहीतर त्यांना पळता भुई थोडी करू,” असा इशारा दिला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी बबनराव लोणीकर आणि संपूर्ण भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, भाजपाच्या ‘एक भाषा, एक धर्म, एक नेता’ या हट्टाखोर मानसिकतेमुळेच अशा प्रकारची जहाल वक्तव्ये केली जात आहेत. “शेतकऱ्यांना सरकार काही देतं म्हणजे उपकार करतं, असा समज भाजपच्या नेत्यांचा आहे. हे अत्यंत संतापजनक असून पोशिंद्याचा बाप काढणारे लोणीकर कोण?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणावरून काँग्रेसने संपूर्ण राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सपकाळ यांनी सरकारच्या कृषी धोरणावरही घणाघाती टीका केली. त्यांनी आठवण करून दिलं की, राज्याच्या कृषी मंत्र्यानेदेखील पूर्वी शेतकऱ्यांना भिकारी संबोधून अपमान केला होता. हे सर्व प्रकार भाजपा सरकारच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे.
त्याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी निशाणा साधला. शक्तीपीठ महामार्गासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद करून सामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि कर्मचाऱ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. “शक्तीपीठ महामार्गाचा घाट दिल्लीच्या आकाच्या इशाऱ्यावर घातला गेला असून मुठभर उद्योगपतींसाठी रेड कार्पेट अंथरला जात आहे,” असे ते म्हणाले.
हिंदी सक्तीविरोधी आंदोलनाबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, “मराठी भाषेसाठी जी आंदोलने होतील त्यात काँग्रेस सहभागी होईल. हा विषय पक्षाचा नसून महाराष्ट्र धर्म आणि संस्कृतीचा आहे.” मराठी भाषेच्या संरक्षणासाठी काँग्रेसने पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानासंदर्भातील या वक्तव्यामुळे भाजप मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. काँग्रेसने स्पष्ट शब्दांत दिलेला इशारा पाहता, आगामी काळात यासंदर्भातील संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो.