भाजप सर्वात दुबळा पक्ष बनला; निवडणूक प्रक्रियेत घोळ असल्याचा आरोप — हर्षवर्धन सपकाळ

0
भाजप सर्वात दुबळा पक्ष बनला; निवडणूक प्रक्रियेत घोळ असल्याचा आरोप — हर्षवर्धन सपकाळ

भाजप सर्वात दुबळा पक्ष बनला; निवडणूक प्रक्रियेत घोळ असल्याचा आरोप — हर्षवर्धन सपकाळ

पुण्यातील पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका करत निवडणूक प्रक्रियेतील घोळ, मतदार यादीतील त्रुटी आणि सत्ताधाऱ्यांवरील निवडणूक आयोगाचा धाक संपल्याचा आरोप केला.


पुणे ११ जानेवारी २०२६ : राज्यातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसून भारतीय जनता पक्ष आज राज्यातील सर्वात दुबळा पक्ष बनला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला. निवडणुकांमध्ये पराभवाची भीती असल्यामुळे भाजपला गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि दुसऱ्या पक्षांतील उमेदवार आयात करावे लागत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. सत्तेचा गैरवापर करून निवडणूक यंत्रणांवर दबाव टाकला जात असून लोकशाहीच्या मूल्यांना तडे जात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

सपकाळ यांनी सांगितले की, राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकांच्या वेळी मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे निवडणूक आयोगाने स्वतः मान्य केले होते. दुबार नावे असलेल्या मतदारांचे मतदान एकाच ठिकाणी होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. हीच परिस्थिती आता येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्येही दिसून येत असून मतदार यादीतील त्रुटी कायम आहेत. निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांवर कोणताही धाक उरलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.

प्रभाग रचना करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरप्रकार करण्यात आल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. लोकसंख्येचे प्रमाण, भौगोलिक रचना आणि स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष करून राजकीय फायद्यासाठी प्रभाग आखणी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे निवडणुका निष्पक्ष न राहता सत्ताधाऱ्यांच्या सोयीने पार पडत असल्याचे चित्र निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवरही सपकाळ यांनी जोरदार टीका केली. अजित पवार रोज भाजपवर टीका करतात, मात्र तरीही सत्तेत भाजपसोबत चिकटून राहतात. ‘गोचीडासारखे वागणे त्यांना शोभत नाही,’ असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप करत असतानाही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘नूरा कुस्ती’ सुरू असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरण आणि जैन बोर्डिंग जमीन प्रकरणांमध्ये अप्रत्यक्ष भ्रष्टाचार झाला असून त्याचे समर्थन अजित पवार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी प्रत्यक्षात न झाल्याचा आरोप करत ‘लाडकी बहीण’ योजनेचे लाभ वाढवण्यात अपयश आल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारने दिलेले दोन कोटी रोजगारांचे आश्वासन फसवे ठरले असून पुण्यात मोफत मेट्रो आणि बससेवेच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे ते म्हणाले.

भाजपच्या प्रतिनिधींना नागरिकांच्या मूलभूत समस्यांशी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. मुकुंद नगर–सॅलेसबरी पार्क प्रभागात आयोजित प्रचार सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत आता गप्प बसायचे नाही, तर लढायचे आहे, असा निर्धार व्यक्त केला. तडजोडीची नव्हे तर लढ्याची, गुलामीची नव्हे तर स्वाभिमानाची आणि संविधान रक्षणाची ही लढाई असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता या सत्ताधाऱ्यांना योग्य उत्तर देईल, असा विश्वासही सपकाळ यांनी व्यक्त केला.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed