भाजीपाल्याच्या दरात घसरण: सर्वसामान्यांना दिलासा, बाजारात मुबलक आवक

0
भाजीपाल्याच्या दरात घसरण: सर्वसामान्यांना दिलासा, बाजारात मुबलक आवक

भाजीपाल्याच्या दरात घसरण: सर्वसामान्यांना दिलासा, बाजारात मुबलक आवक

गेल्या काही दिवसांत भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. काकडी ३० रुपये, बटाटा २५ रुपये, कांदा १७ रुपये किलो अशा दरात उपलब्ध; सर्वसामान्यांना दिलासा.

सायली मेमाणे

पुणे ३ सप्टेंबर २०२५ : राज्यातील बाजारपेठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरांमध्ये झालेल्या घसरणीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. काही आठवड्यांपूर्वी मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. हंगामी पिकांची लागवड व संगोपनावर परिणाम झाल्याने बाजार समित्यांमध्ये आवक घटली होती आणि अनेक भाज्यांचे दर ८० ते ९० रुपये किलोपर्यंत गेले होते. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र आता भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर कमी झाले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

पावसाने सरासरीपेक्षा कमी हजेरी लावल्याने आधीच शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. याचा थेट परिणाम बाजारपेठांवर झाला आणि भाज्यांचे दर झपाट्याने वाढले. सर्वसामान्य ग्राहकांना काकडी, टोमॅटो, बटाटा, वांगी, शेंगा यांसारख्या भाज्यांसाठी दुप्पट दर मोजावे लागत होते. परंतु गेल्या काही दिवसांत भाजीपाल्याची मुबलक आवक सुरू झाल्याने परिस्थितीत बदल झाला आहे.

आजच्या दरांची माहिती पाहता, काकडी ३० रुपये किलो, गाजर ४० रुपये किलो, फ्लॉवर ४० रुपये किलो, पत्ताकोबी ४० रुपये किलो, टोमॅटो ३० ते ४० रुपये किलो, लिंबू ३० ते ४० रुपये किलो, कोथंबीर १० रुपयांना जुडी, शिमला मिरची ६० रुपये किलो, वांगी ५० रुपये किलो, गवार ५० रुपये किलो, बटाटे २५ रुपये किलो, कांदा १७ रुपये किलो, मिरची ४० रुपये किलो आणि गिलके ४० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. हे दर मागील आठवड्यापेक्षा जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

दरातील या घटेमुळे बाजारात ग्राहकांची चांगली गर्दी दिसून येत आहे. स्वस्तात भाजी मिळाल्याने सर्वसामान्यांना खरेदी करताना दिलासा मिळत आहे. दुसरीकडे, बळीराजासाठी मात्र ही परिस्थिती थोडी चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वी दर चांगले मिळत असतानाच आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत. शेतकऱ्यांना उत्पादनाचा खर्च वसूल करणेही कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत असला तरी शेतकरी मात्र भाव घसरल्यामुळे चिंतेत आहेत.

भाजीपाल्याच्या दरातील चढ-उतार ही प्रत्येक हंगामात दिसणारी बाब असली तरी यंदा पावसाच्या असमानतेमुळे दरांचा चढ-उतार अधिक जाणवतो आहे. बाजार समित्या आणि शासनाने अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *